सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीच्या दर्शनाने अंगात हत्तीचे बळ संचारले होते. स्वराज्याची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर सांभाळणारे हंबीरराव मामा लहानपणी ज्याच्या अंगाखांद्यावर खेळले असतील तो किल्ले श्री वसंतगड कसा असेल ? स्वराज्याच्या धाकल्या धन्याच्या खांद्याला खांदा लावून मोगली फौजेला सळो की पळो करून सोडणाऱ्या हंबीरराव मामांच्या बालपणीचा सवंगडी कसा असेल ? अशा विचारांच्या कल्लोळातच किल्ले श्री वसंतगडच्या पायथ्याहून झेपा टाकतच गडाला जवळ करू लागलो. बांधीव पायऱ्या असल्याने माझी गती क्षणाक्षणाला वाढत होती. जसा जसा गड जवळ येऊ लागला तसे तसे माझ्या नजरेला वसंतगडाच्या कातळ कड्याचे आणि तटबंदीचे दर्शन होऊ लागले. काळजाला ओढ ओढ ती कशी लागते ती मी पावला पावलाला अनुभवत होतो. मनात एकच वादळ घोंघावत होते .बलदंड ,बलशाली बाहूंच्या हंबीरमामांना युद्धकलेचे धडे देणारा वसंतगड डोळे भरून पाहायचा.तिथल्या चंद्रसेन महाराजांच्या मंदिरात नतमस्तक होऊन "भारतमातेच्या पदरात हंबीरमामा आणि ताराराणी सारखी रत्ने सतत घालत जा" असे दान मागावे हीच इच्छा उरात बाळगून धडधणाऱ्या छातीसह मी गडावर प्रवेश करता झालो.
गडाच्या कोरीव पायऱ्या चढून जाताच मी गडावर दाखल झालो. डोळ्यासमोर तो वसंतगडाचा विशाल पसारा लक्षात आला.आजूबाजूला खूप साऱ्या ऐतिहासिक इमारतींचे अवशेष पसरलेले होते. डाव्या बाजूला असणाऱ्या बजरंगबलींचे दर्शन घेऊन वाड्यांचे अवशेष पाहातच मी चंद्रसेन महाराजांच्या मंदिरात पोहोचलो.कुठेही आढळणार नाहीत असे दोन नंदी एकत्र मंदिराच्या मंडपात आहेत. मंदिरात चंद्रसेन महाराजांचे दर्शन घेऊन मंदिराच्या मागे गेलो तर दूरवर असणारा गडाचा उत्तर बुरूज मला खुणावत होता आणि आपल्या उंचीने मान उंचावून मला बोलावत होता ....मग काय ? निघालो लगेच त्याच्या भेटीला. मी जसजसा जवळ जाऊ लागलो तसे तसे त्यांची उंची डोळ्यांना जाणवू लागली. वीस पंचवीस फूट उंच आणि मुख्य तटबंदीपासून सुट्या स्वरूपात त्याची बांधणी माझा उत्साह वाढवत होती. काय त्याची उंची ....? आणि काय त्यासाठीचे अजस्त्र घडीव दगड.... ? अबबब ..... आपल्यासारख्या तिघा चौघांना मिळून प्रयत्न केलाच तरी हलणारही नाहीत असे मोठमोठाले दगड आपल्या पूर्वजांनी इतक्या उंच बुरूजावर रचले कसे असतील...? याचेच कोडे पडत होते.आणि असा नवसाचा फक्त एकच दगड नव्हता ... तर प्रत्येक दगड न् दगड तितक्याच तोलामोलाचा होता. मात्र या काळ्या कभिन्न पत्थरांनी माझ्या मनात विचारांचे वादळ उठवले होते.आपल्याला एक दगड जागचा हलणारही नाही असा आहे , यापैकी एखादा मातब्बर दगड कोणी नुसता हलवायचा जरी ठरवला तरी त्याच्या नाकी नऊच नव्हे तर चांगले शे-दोनशे आल्याशिवाय राहाणार नाहीत .आणि असे हजारो नव्हे तर लक्षावधी पत्थर गडनिर्मात्यांनी घडवून रचलेले होते आणि असे शेकडो किल्ले सह्याद्रीच्या गिरीशिखरावरती उभारले होते. या अशा भारावलेल्या विचारांनीच मी वळणावळणाच्या तटबंदीवरून चालत निघालो . वाटेत डाव्या बाजूला पाण्याचे दोन तलाव लागतात. त्याच्या पुढे पश्चिमेस चालत गेल्यावर गडाचा सुस्थितीत असलेला दरवाजा दिसला.दरवाजा अतिशय भक्कम बांधणीचा असून त्याच्या शेजारीच आणखी एक लंबगोलाकृती आकार असणारा आणि दक्षिणोत्तर लांबवलेला बुरूज आहे. तोही तितकाच विशाल आहे .तो पाहून गडाच्या दक्षिण तटबंदीवरून चालत चालत वाटेवरील कमळांच्या फुलांनी सजलेला तलाव पाहत आग्नेय दिशेच्या बुरूजाजवळ पोहोचलो..तिथे गडावर येणारी एक डोंगरवाट होती कदाचित तिथे चोर दरवाजा असावा. त्या पुढे जवळच आणखी एक पूर्व दिशेला असणारा बुरूज असून त्याला लागून गडावर शिल्लक राहिलेली चांगल्या स्थितीत असणारी तटबंदी आहे ती पाहिली. खरे तर गड चढाई करताना गड जितका लहान वाटतो त्याहून जास्तच गडाचा विस्तार आहे जो गडावर गेल्याशिवाय लक्षात येत नाही .त्यामुळे थोड्या वेळात वसंतगड पाहून येईन अशी स्वप्ने पाहत गड चढणाऱ्याला श्री वसंतगड त्याचा पाहूणचार करून, पोटभर त्याच्या मनाचे समाधान करून ,चांगला दोन अडीच तासाचा वेळ घेऊनच परत पाठवतो.अशा या वसंतगडाला मनोभावे नमस्कार करून त्याचा निरोप घेतला .आणि ज्या गतीने गड चढाई केली त्याच्या दुप्पट वेगाने गडउतार होऊन पुढे निघालो आजही महामार्गावर ताठ मानेने लक्ष ठेवून असणाऱ्या आभाळाला भिडलेल्या वैराटगडाला भेटायला.
महामार्गावरून जाताना माझ्या डोळ्यांना दोन्ही बाजूंना गडकोटांनी सजलेला सह्याद्रीच दिसत होता. डावीकडे सज्जनगड,अजिंक्यतारा तर सातारा पार करताच उजवीकडे चंदनवंदन दूर्गजोडी,दूर किल्ले श्री नांदगिरीही मान ताठ ठेवून उभा होता. सातारा पुढील खिंड ओलांडताच दिसू लागला आभाळाला भिडलेला श्री वैराटगड .त्याचा फोटो घ्यावा म्हणून दोन मिनिटे गाडी थांबविली आणि पाहतो तर काय ? मोबाईलराव पार थंड पडले होते....आता ? आता काय करायचं ? पायथ्याशी गेल्यावर पाहू असे ठरविले आणि पाचवड फाट्यावरून वाई मार्गावर सरताळे नावाच्या गावी पोहोचलो.थोडी विचारपूस करताच तिथे हनुमान मंदिर असून चार्जिंगची सोय होईल असे समजले.मग तिथे जाऊन फोनच्या आणि माझ्या दोघांच्याही भोजनाची सुरूवात केली.सर्व आवरून गावातून गडाकडे जाणारी वाट धरली. तिथे असणाऱ्या स्थानिक लोकांनी दाखवलेल्या वाटेनेच गड चढायला सुरूवात केली.तिथे गायी चारणारे मामा मला बोलले " आता चार वाजत आलेत ; तू जाणार कधी ? आणि परत येणार कधी ? " यावर मी लगेच उत्तर दिले.."मामा,हे गेलो आणि हे आलो, पाहाच तुम्ही " असे म्हणून मी गडाला जवळ करू लागलो.
पायथ्याहून दिसणाऱ्या गडाच्या रूपड्याचे काय वर्णन करू ? गर्द निळ्या आकाशात एखादी समशेर घुसावी तसा गडाचा कातळ दिसत होता . त्या रूपाला पाहून मी वेडापिसा होऊन गडचढाईस सुरूवात केली ..खड्या डोंगराचे तीन टप्पे आणि घनदाट जंगलातील दोन टप्पे पार केल्यानंतर गडाचा कातळ लागतो.जसा गड चढू लागतो तसा पाठीमागचा सुंदर डोंगर क्रमाक्रमाने छोटा होऊ लागतो आणि त्याच्या पलिकडे चंदन-वंदन ही दूर्गजोडी दिसू लागते. गड चढत असताना वैराटगड काय ताकदीचा आहे ते समजू लागले.माझी छाती भात्याप्रमाणे धपापत होती. हृदयाची अखंड चालणारी धडधड एक फूट दूर असणाऱ्या कानांना स्पष्ट जाणवत होती. आणि एखाद्या व्यक्तीला सायंकाळीही जास्तीत जास्त किती घाम येऊ शकतो हे कळू लागले होते.घामाच्या अखंड धारांनी मला अभिषेक घालायला सुरूवात केली होती. अशा धडधडणाऱ्या अंतःकरणासह गडाच्या कातळकड्याजवळ पोहोचलो.कातळाच्या उत्तर बाजूने वाट आहे आणि कातळाच्या पायथ्याशी खोदीव पाण्याची टाकी होती.त्यांना पाहातच गडाच्या दरवाजात दाखल झालो.थोड्या कोरीव पायऱ्या त्याला लागूनच असलेला हिरवागार वृक्ष आणि नभातून डोकावणारा अष्टमीचा अर्धा चंद्र असे मोहक दृश्य पाहून मी हरखून टुम्म झालेलो.पटकन हे दृष्य टिपून घेतले आणि गडावर दाखल झालो.गडावर दोन तलाव,हनुमान मंदिर आणि वैराटेश्वराचे मंदिर होते. गडाचा माथा सपाटीचा होता आणि चोहोबाजूंनी तटबंदींने बांधून घेतला होता.अगदी काटेकोर बांधलेल्या तटबंदीवरून फेरफटका मारण्याचा मोह कुणालाही व्हावा.त्या तटबंदीला निरखत पारखत त्यावरून फिरू लागलो आणि अचानक एक बहिरी ससाणा फडफडत आकाशात झेपावला ,काही कळते न कळते तोच त्याची दिशा माझ्याकडे वळली काळजात एक शिरशीरी उठली . मला त्याची भाषा कळत नव्हती आणि त्याला माझी....करावे तरी काय ? पण माझ्या हाती काठी असल्याने त्याने पुन्हा दिशा बदलली आणि मीही माझ्या वाटेने पुढे जात गडफेरी पूर्ण केली.
सायंकाळचे साडेपाच होत आले होते . गडाची सावली हळूहळू पुढे झेपावत अवघा मुलूख काबीज करत सुटली होती. हे सर्व मनात आणि डोळ्यांत साठवत गड उतार झालो . आजची सरसेनापतींच्या भेटीची आणि चार दुर्गांची भेट घेण्याची इच्छा पूर्ण झाली होती श्री वसंतगड आणि श्री वैराटगड या दोन्ही मातब्बर दुर्गांनी उंची आणि विस्तार अशी आपली विराट रूपे दाखवून मला समाधानी केले होते.आणि त्याच समाधानात मी पुण्याकडे मार्गस्थ झालो.


























































