Saturday, January 4, 2020

सरसेनापतींच्या भेटीला



          सातारा जिल्ह्यातील दुर्गदर्शन करीत पुण्याहून गावी सुट्टीसाठी गेलेलो. सुट्टी संपली आणि परतीच्या वाटेस लागलो. या परतीच्या वाटेतही गडदुर्गांचे दर्शन आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस वंदन करूनच पुणे गाठायचे असे ठरविले होते. ठरल्यानुसार किल्ले श्री विलासगड ,श्री मच्छिंद्रगड ,किल्ले श्री वसंतगड आणि किल्ले श्री वैराटगड यांना भेटण्यासाठी निघालो .2 जानेवारी 2020 रोजी पहाटे सहाला गारठवणाऱ्या थंडीतच घरचा निरोप घेतला. लक्ष्य होते सांगली जिल्ह्यातील  येडेनिपाणी गावाजवळील मल्लिकार्जुन डोंगर म्हणून ओळखला जाणारा अपरिचित विलासगड.आठ वाजताच गड पायथ्याशी पोहचल्यावर सकाळच्या कोवळ्या उन्हात न्हाऊन निघणारा श्री विलासगड लोभसवाणा दिसत होता. पायथ्याशीच एक सुंदर मोरपीस सापडले ते पाहून मन आणखी प्रसन्न झाले आणि गडचढाईस सुरूवात केली .सोपी गड चढाई आणि सकाळची थंडी यामुळे अगदी वीसमिनिटात  गडावर पोहोचलो.गडावर गडाचे गडपण जपणारा एक दरवाजा,श्री कृष्ण मंदिर , दोन भूमिगत कोठारे आणि दोन तलाव आहेत.हे सर्व पाहून मी गड उतार झालो.
        विलासगडहून निघालो आणि  मच्छिंद्रगड च्या आधी थोड्या अंतरावर असणाऱ्या  कोळे नरसिंहपूर या कृष्णाकाठच्या नितांत सुंदर नरसिंह मंदिरासमोरच थांबलो. संथ वाहते कृष्णामाई ही उक्ती सार्थ करणाऱ्या कृष्णा नदीच्या दोन्ही काठावर हिरवळ दाटीवाटीने पसरली होती. दूरवर दिसणाऱ्या नारळाच्या झाडावरून नजर हटता हटत नव्हती आणि अशा सुंदर ठिकाणी जमिनी पासून खाली पंधरा फूट भुयारात उतरून आपणास नरसिंह मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचतो.आपल्या मांडीवर हिरण्यकश्यपला घेऊन त्याचा वध करणाऱ्या नरसिंहाची मूर्ती इतकी सुंदर आहे की नकळत आपल्या मनात येऊन जाते की आपले सर्व अवगुण मनोभावे अलगद त्या नरसिंहाच्या हाती द्यावेत आणि  त्याच्या हस्ते आपल्या अवगुणांचा वध करावा. अशा भक्तीमय वातावरणातच श्रींचा निरोप घेऊन पुढे मार्गस्थ झालो.
            अगदी वीस मिनिटांतच छत्रपती शिवरायांनी बांधलेला अखेरचा गड म्हणून ओळखला जाणारा किल्ले श्री मच्छिंद्रगड आहे. गडावर जाण्यासाठी दोन पायरी मार्ग आणि एक अगदी खडा गाडी मार्ग आहे. गडावर पोहोचताच श्री मच्छिंद्रनाथांचे सुंदर मंदिर पाहिले.मंदिराच्या पुढेच इतिहासाची साक्ष देणाऱ्या तोफा व्यवस्थित ठेवल्या आहेत.मंदिराच्या आवारात वाड्याचे अवशेष आहेत.मंदिराच्या मागील बाजूला चुना मळणीचा घाणा आणि त्याचे चाक सुस्थितीत असलेले दिसते तसेच एक मोठी कोरडी विहीर आहे,नंतर तटाकडेने पुढे गेल्यावर जुन्या काळातील समाध्या दिसतात. तिथून आग्नेय दिशेला एक ढासळलेला चिलखती बुरूज आहे. बुरूजाचे घडवलेले काळे कभिन्न दगड तिथे विखूरलेल्या अवस्थेत होते.  त्या बुरूजाच्या खाली उतरून खालील बाजूने तटबंदी पाहिली. गडाच्या पश्चिम दिशेला बुरूजावर एक सुंदर घुमटी बांधलेली आहे. तिथून गडाचा पश्चिम भाग अतिशय सुंदर दिसत होता.स्वतः शिवाजी महाराज यांनी जे एकशे अकरा गडदुर्ग बांधून घेतले त्यातील अखेरचा बांधालेला गड म्हणून किल्ले श्री मच्छिंद्रगडाला ओळखले जाते. इतिहासात इतके महत्त्वाचे स्थान लाभलेला गड मात्र अगदी शांत संन्यस्थ ऋषी ध्यान धरून बसावा इतका शांत आणि गडप्रेमीपासून दुरावलेला जाणवला. त्याला मनापासून नमस्कार केला आणि मी पुढील वाटचालीस निघालो.
          आता जायचे होते स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीला वंदन करायला .स्वराज्याच्या लढाईत प्राणपणाने झुंजणारे हंबीरराव,दक्षिण दिग्विजय मोहिमेत असामान्य कर्तृत्व गाजवणारे हंबीरराव,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पाठीशी सह्याद्रीच्या कड्याप्रमाणे खंबीरपणे उभे रहाणारे हंबीरराव ,स्वराज्याचा स्वातंत्र्यसूर्य तळपत राहण्यासाठी औरंगजेबाच्या फौजेसमोर मृत्यूचे तांडव करत समशेर गाजवणारे हंबीरराव आणि शेवटी याच स्वराज्याच्या मातीसाठी मोगली फौजांशी झुंजत झुंजत देह ठेवणारे हंबीरराव . अशा स्वराज्याच्या स्वामीनिष्ठ सेनापतीला मनोभावे नमस्कार करण्यासाठी निघालो होतो.मनात आनंदाचे आणि स्फुर्तीचे भरते येत होते.कधी एकदा जाऊन त्या सेवकाच्या पायावर माझे डोके ठेवतोय असे झाले होते.पुण्याला जाताना कराडच्या पुढे अकरा किमीवर  तळबीड गावामध्ये किल्ले श्री वसंतगडच्या पायथ्याशी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे समाधी स्मारक आहे. हिंदुस्थानातील मातीत  देशभक्तीचे व्रत घेतलेले तरूण जन्माला येण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या त्या धारातीर्थासमोर नतमस्तक झालो. स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वतःचा देह झिजवणाऱ्या वीराच्या समाधीचे दर्शन घेतल्याचे समाधान मनाला कृतकृत्य करत होते. त्या समाधानातच शिवरायांच्या सरसेनापतींचा निरोप घेतला आणि किल्ले श्री वसंतगडाला भेटायला अक्षरशः धावत सुटलो. इतिहासातील एका महत्त्वाच्या मातब्बर सेनापतीला आणि स्वराज्याची भद्रकाली महाराणी ताराराणी यांना घडवणाऱ्या गडाला भेट द्यायची होति ना. कसा आहे तो वसंतगड ते पहायचेच नव्हे तर अनुभवायचेही होते ना ? म्हणून आपल्या सोबतीला पायथ्याशी लावून वसंतगडाला भेटायला धावत सुटलो.

(क्रमशः)



































No comments:

Post a Comment

नक्की महत्त्वाचे काय ?

  28 मे 2023 रोजी महिला कुस्तीगीर विनेश फोगट आणि साक्षी मलिक या  लैंगिक अत्याचाराचे आरोप करीत निदर्शन करीत होत्या त्यांना दिल्ली पोलीस रस्त्...