Thursday, February 9, 2023

विरोधकांचा आशावाद....!

 




        नरेंद्र मोदी यांची प्रचंड लोकप्रियता पाहून आज काल विरोधक असा प्रचार करायला मागेपुढेही पाहेनासे झाले आहेत की हिटलरही असाच फार लोकप्रिय होता आणि त्यामुळे नरेंद्र मोदीही अशा लोकप्रियतेचा फायदा घेऊन हिटलर बनतील.  लोकप्रिय फक्त हिटलरच असतात हे म्हणणेच किती संकुचित आणि निराधार आहे हे जगाच्या इतिहासात सहज जरी डोकावून पाहिले तर समजून येईल. जगाचे सोडा हो इथेच भारतीय इतिहासात गेल्या शतकात होऊन गेलेल्या लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांच्या यादीवर एकदा नजर टाकून पहा. 

     विवेकानंद, लोकमान्य टिळक, राजर्षी शाहूमहाराज, लाल-बाल-पाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहिद भगत सिंग, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, नेताजी बोस, वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, राम मनोहर लोहिया, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही आणि अशीच एकाहून अधिक उत्तुंग काळाला लाजवतील अशी लोकप्रिय महान व्यक्तीमत्वे होऊन गेली. यापैकी कोणी हिटलर नाही झाला. मुळात भारतीय समाज अशा मनोवृत्तींना लोकप्रिय करत नसते हा इतिहास आहे आणि असा कोणी त्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन हिटलरी म्हणजेच दडपशाही मनोवृत्तीने राज्य करण्याचा प्रयत्न जरी केला तर त्याला पायाखाली घ्यायलाही भारतीय समाज मागेपुढे पाहात नाही हे आपण आणीबाणी नंतरच्या इंदिरा गांधींच्या पराभवातून शिकायला हवे.

           मग आताच अशी भीती घालून दिशाभूल करावीशी का वाटते? गेल्या बावीस वर्षात चिखलफेक करूनही एक नेता जनतेच्या गळ्यातला ताईत कसा काय बनून राहिला? हे कोडे न सुटण्यात याचे कारण दडलेले आहे. एखादा व्यक्ती इतका अचाट आणि अफाट लोकप्रिय असूच कसा शकतो ? हीच मूळची पोटदुखी आहे. म्हणून मग या लोकप्रियतेची हवा सदर नेत्याच्या डोक्यात जाईल, तो मग्रुर होईल, त्याच्या हातून ऐतिहासिक चूक होईल, त्याचा लोक तिरस्कार करतील, जनता त्याला सत्तेवरून खाली खेचेल आणि मग आपण राज्य करू हा कर्तृत्वशून्य, पोकळ असा वांझ आशावाद चालू होतो. सध्या आपण फक्त त्यावर जहरी टीका करत राहू बस आपले काम एवढेच. अशा भ्रमात आजचे विरोधक आहेत. 

 थोडक्यात लोकप्रिय असणारा प्रत्येक सत्ताधीश हिटलरी मनोवृत्तीचा असत नाही , हिटलरी मनोवृत्तीचा प्रत्येक व्यक्ती लोकप्रिय सत्ताधीश असत नाही आणि हिटलरी मनोवृत्ती बाळगणारा सत्ताधीश फार काळ टिकत नाही. बघा यापैकी कोणत्या गटात जायचे आहे. ठरवायचं काम विरोधकांचे आहे.


सुहास पाटील 

रेंदाळ

Monday, January 23, 2023

यशवंतरावांची मातोश्री.....!

 



        यशवंत जाधव यांनी मातोश्री म्हणजे माझी आई असा खुलासा दिला आहे याचा अर्थ ही डायरी खरी आहे त्यातील नोंद स्वतः त्यांनी केलेली आहे हे त्यांनी मान्य केले आहे राहता राहिला प्रश्न दोन कोटीचे गिफ्ट आणि पन्नास लाखाचं घड्याळ याच्या वैध अवैधतेचा, ज्याच्या झडतीत केवळ 2 वर्षात 30 हुन अधिक मालमत्तांची कागदपत्रे सापडतात दोन कोटींची रोकड सापडते त्याच्या या डायरीतील नोंद कितपत कष्टाच्या आणि घामाच्या पैशाची आहे हे तुम्ही जनतेला पटवून द्या आणि मग केंद्रीय तपास यंत्रणा राजकारण करतेय म्हणून नक्कीच गळे काढा.


सुहास पाटील 


२०/०३/२०२२

शिवसेनेत दुभंग....!!.







 



शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नव्हे ...

तो एक विचार आहे, एक अस्मिता आहे, एक संघटना आहे आणि नेहमी अन्यायाविरूद्ध पेटून उठणारा हुंकार आहे.

         हे सगळं गुंडाळून ठेवून ज्या क्षणी उद्धवराव शरद पवारांच्या डोक्याने आणि संजय राऊतांच्या सल्ल्याने राजकारण करू लागले तसतसे वास्तवतेपासून दूर जात गेले. मी हे बोलतोय हे तुम्हाला कदाचित पटणार नाही, आवडणार नाही, समजायचे तर त्याहून दूरची गोष्ट.

तरीही एक उदाहरण देतो.

ज्या दारूविक्री विरोधात आपल्या गावातील मंडळाने आवाज उठवला, गावातील राजकारण्यांविरोधात उभे राहण्याचे धाडस केले ती वृत्ती म्हणजे खरी शिवसेना आहे आणि त्याचवेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून किराणामालाच्या दुकानात वाईन विक्रीचा निर्णय राज्यसरकार माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीने घेतला जात होता. या दोन्ही गोष्टीतील विसंगती दिसत नाहीये का ?

आपल्याकडे मांडायला मुद्दा नसला की भाजपवर आरोप करणे ही सोपी पळवाट असेलही कदाचित, म्हणून काही त्याच्या साहाय्याने आपला पक्ष आणि संघटना मजबूत होत नसते. याचे भान जितक्या लवकर येईल तितक्या लवकर  संघर्षातून उभ्या राहिलेल्या शिवसेनेला पुन्हा नव्याने दैदिप्यमान इतिहास घडवता येईल.

(माहीतीसाठी - या वाईन विक्रीच्या विरोधात सांगली मध्ये श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने मोर्चा काढला गेला होता.)

सुहास पाटील 

२५/०६/२०२२


राजकीय धारणा...!


 आवडती माणसं नावडती झाली की त्याची प्रत्येक गोष्ट तिरस्करणीय वाटू लागते, आपल्या विचारांचा ताबा आपण एकदा का द्वेषाच्या हातात दिला की मग आपल्याला धडधडीत असणारे सत्यही दिसायचे बंद होते आणि मग त्यावेळी त्या नावडत्या व्यक्तीचा विजय आपण आपल्याच हातांनी त्याच्याकडे सुपूर्द करतो...

सुहास पाटील 

२९/०७/२०२२

नवीन मुख्यमंत्री आणि त्यांची दिशा.....!



 

तुम्ही ज्याला फुटीर, बंडखोर आणि निरनिराळ्या अपशब्दांनी हिणवताय तो माणूस इतक्या राजरोसपणे जनसामांन्यात फिरत आहे, आपले समर्थक पाठीराखे वाढवत आहे. तुम्ही डोळे मिटून बसला म्हणून जनतेला हे दिसायचे थांबणार थोडीच आहे ? तुम्हाला दुःख झालेय, खूप वाईट वाटतेय म्हणून सर्व जनतेलाही वाईटच वाटले पाहिजे किंबहुना वाईटच वाटत आहे या भ्रमातून जितक्या लवकर बाहेर याल तितक्या लवकर या माणसाला पराभूत करण्याचे मार्ग दिसतील....नाहीतर 2002 पासून चिखलफेक सोसणारा माणूस आज दोनवेळेला प्रधानमंत्री झाला आहे हा इतिहास काही फार जुना नाहीये...!! 

बघा बुवा पटतंय काय ? ?

सुहास पाटील 

२९/०७/२०२२


पदभार आणि पदभान.....!


 

आपण कोणत्या पदावर आहोत आणि काय बोलतोय याचे भान राखता येत नसेल तर सततच्या व्रात्यपणामुळे आपण त्या पदाचेच अवमूल्यन करीत नाही ना ? याचे आत्म परिक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे...धर्मराजाची बाजू आहे म्हणून प्रत्येक गोष्ट समर्थनीयच असेल असे नाही. सम्राट आहे म्हणून त्याला आज्ञा न देता शांत बसण्याने पितामहा भीष्मासमोरच एका अभिषिक्त राणीची विटंबना होण्याचा आणि सर्वनाशाच्या आरंभाचा उत्कलनबिंदू गाठला जातो. चांगले बोलता येत नसेल तर निदान वाईट घडेल, वाटेल असे बोलू तरी नये अशी सर्व सामान्यांच्या धारणेला तुम्ही धक्का दिलेला आहे... कोणतीही सारवासारव न करता आणि वस्तुस्थिती आहे असे सांगून समर्थन न करता बिनशर्थ माफी मागितली तर उरलासुरला आदर जिवंत राहील.... अन्यथा सर्व शक्तीशाली झाल्याच्या भ्रमात गेलेल्या कित्येकांच्या पतनाच्या कहाण्या आम्हीही ऐकून आहोत, काही दिवसापूर्वीच पाहूनही आहोत....


सुहास पाटील 

३०/०७/२०२२

इमानी सेवकाची किंमत....!


 इमानदार स्वाभिमानी सेवकाला तुम्ही जेव्हा गुलाम समजू लागता तेव्हा तुमच्या लेखी त्याची किंमत शून्य होऊन जाते आणि जेव्हा हा शून्य तुमच्यापासून दूर होतो तेव्हा तुमची किंमत दहापटीने कमी होऊन जाते....तेव्हा त्या दूर गेलेल्या आजवरच्या इमानी सेवकाला शिव्या शाप देण्यातून त्याच्यातील इमानदारी यत्किंचितही कमी होत नाही तर तुमच्यातील  कोतेपणाच जगासमोर उघडा पडू लागतो.....

सुहास पाटील. 

३०/०७/२०२२

महाराष्ट्रातील आयपीएल...!

 



महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई ईंडियन्स यांचा सामना सुरू आहे आणि ज्या त्या संघाचे चाहते आपला संघ कसा लढतोय याकडे लक्ष देऊन आहेत. यामध्ये एक लक्षात असू द्या की दोन्ही बाजूंनी मारलेल्या षटकाराची किंमत सहा धावाच असणार आहे.....आपल्या संघाच्या खेळाडूने खेचलेला षटकार षटकार ठरवा आणि समोरच्या प्रतिपक्षातील खेळाडूने षटकार खेचला तर त्याला बाद ठरवा असा खेळ असत नाही. आपल्याला प्रतिपक्षाने मारलेला षटकार आवडत नसला तरी तो मान्य करणे ही खरी खिलाडू वृत्ती असते. गल्लीक्रिकेटमध्ये बॕट आणि बॉल यांची मालकी एखाद्याची असू शकते पण त्याला खेळाच्या नियमांचे मालक होता येत नाही. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जात असला तरी पंचानी बाद ठरवताच निमूटपणे मैदानातून बाहेर होणे हे त्याचे कर्तव्य बनून जाते. त्याप्रमाणे कायदे, न्यायाधीश आणि निवडणूक आयोग हे नियमावर बोट ठेवूनच निर्णय देणार आहेत.आवडता निकाल खरा आणि नावडता निकाल खोटा अशी विभागणी असत नाही . हां, दिलेल्या निर्णयावर फेरविचार याचिका (क्रिकेटमधील DRS) दाखल करू शकता पण त्यातून मिळणारे समाधान तात्पुरतेच असते.

सुहास पाटील 

०२/०८/२०२२

उद्धव ठाकरेंनी गमावलेली सुवर्णसंधी.....!

 


नुकतेच पावसाळी अधिवेशन संपन्न झाले. यामध्ये एका हरहुन्नरी राजकीय व्यक्तीमत्वाची ओळख महाराष्ट्राला नव्याने झाली. केवळ मित्र पक्षच नव्हे तर अगदी राजकीय कारकीर्दीच्या जन्मापासून ज्यांनी  वैचारिक विरोधातच भूमिका मांडली, कट्टरपेक्षाही कट्टर वैरत्व पत्करले अशा दिग्गज राजकीय विभूती मंडळींनाही हसत-हसत दाद देऊन हात जोडायला लावणारा मुख्यमंत्री नेता महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीजावर उगवला आहे. एखाद्याचा राग येणं, चीड येणं, द्वेष असणं ही स्वाभाविक मनोवृत्ती आहे. पण अशा द्वेषमूलक राजकीय मुद्द्यांना 'विनोदी' अस्त्राने नामोहरम करणारा राजकारणी तुम्हाला पराभूत करायचा असेल तर त्याच्या इतकेच व्यवहारी, हुशार, हजरजबाबी आणि द्वेषविरहीत असावे लागेल. केवळ टीका आणि टोमण्यांनी तो पराभूत तर होणारच नाही, उलट आणखी बलशाली होऊन तुमच्या समोरचे सर्वात मोठे आव्हान बनून राहील. कारण सन 2002 पासून केवळ बदनामी करून नरेंद्र मोदी नावाच्या माणसाला पराभूत करता येईल अशा भ्रमात राहिलेल्या प्रत्येक पुरोगाम्यांना, राजकारण्यांना, पत्रकारांना आणि विचारवंतांना मोदी नावाचे राजकीय आव्हान पेलवता पेलवत नाहीये. 

         जर एकनाथ शिंदे अडीच वर्षापूर्वीच मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभले असते तर कदाचित पक्ष संघटना बळकट करून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वगुणांनाही झाकोळून टाकले असते. पण असे होणे नव्हते हिऱ्यासारखा असा मौल्यवान माणूस देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या पारड्यात स्वतःहून टाकणाऱ्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री माननीय विधानपरिषद आमदार उद्धव ठाकरे तसेच विधानसभा आमदार आदित्य ठाकरे यांना भाजपचे चाहते आणि हितचिंतक मनोमन धन्यवाद देत असतील. पाहू अजूनही निवडणूक आयोगाचा आणि मुंबई महानगरपालिकेचा  निकाल यायचा आहे. तो येईल तेव्हा राब-राब राबणाऱ्या कार्यकर्त्यांचे मूल्य काय असतं हे कळून येईल कदाचित, तेही कळून घ्यायचं असेल तर,नाहीतर आहेच संभाजी ब्रिगेड मदतीला..

सुहास पाटील. 

२८/०८/२०२२

सरस्वती आणि शिक्षण.....!

 



पूर्वाश्रमी शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभा गाजवून सोडणारे सध्याचे राष्ट्रवादीचे आमदार यांनी नुकतेच एक क्रांतिकारक विधान केले "आमच्या भगिनींच्या अंधश्रद्धेबद्दल काय बोलावे? आजकाल शाळेत सरस्वती शारदामातेचे फोटो लावले जातात, सावित्री मायचा लावा, ज्योतिबा फुलेंचा लावा, शाहू महाराजांचा लावा.....ज्या सरस्वतीला आम्ही पाहिलं नाही ,जिने आम्हाला कधी शिकवलं नाही ,शिकवलं असेलच तर तीन टक्क्यांना तिचा फोटो आम्ही का लावावा ? वगैरे वगैरे ..." 

       सदर विधानामध्ये वर वर पाहता थोर समाजसुधारकांचा आदर दिसून आल्याने सरळमार्गी व्यक्तीला या विधानाचा पुरस्कार करावा की तिरस्कार करावा? याबद्दल बुचकळ्यात पडतो आणि गोंधळून जातो. मुद्दा समाजसेवकांचा फोटोसाठी आग्रहाचा नसून सरस्वती पूजनाबद्दलच्या पोटदुखीचा आहे. कोणाच्याही फोटोपूजनाचा आग्रह जरूर असावा पण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरस्वती शारदामाता या हिंदू दैवी प्रतिकांवर आघात केला जातोय हे काहींना लक्षातच आलेले नाही. सरस्वती मातेचा मोठा भक्त वर्ग किंवा देवस्थान नसल्यामुळेच छगनराव हे विधान करू धजले. एखाद्या वादाचा किंवा विषयाचा आरंभ होतो त्याचा प्रवास कुठे पर्यंत जाऊन थांबू शकतो याची कल्पना सदर विधानाचा पुरस्कार करणाऱ्यांना नसावी. उदाहरणार्थ विद्येची देवता जशी सरस्वती माता आहे तशी कलेची देवता श्री गणराय आहेत, समृद्धीची देवता श्री लक्ष्मी माता आहे, बलोपासनेची देवता श्री मारूतीराय आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आहे इत्यादी इत्यादी. 

       आता मला सांगा श्रीयुत छगनराव तुमच्या विचाराप्रमाणे यातील कोणतीच देवता कोणीही पाहिली नाही मग तुम्ही प्रत्येक कलेच्या सादरीकरणाआधी गणेशवंदना ऐवजी बच्चन वंदन घेणार आहात का ? दीपावलीमध्ये समृद्धीची देवता असणाऱ्या लक्ष्मीपूजनाऐवजी अंबानी-अदानी पूजनाचे कार्यक्रम घेणार आहात का? गावोगावचे मल्ल आखाड्यात मारूतीरायाचे स्मरण करून शड्डू ठोकतात त्यांना दरवर्षीच्या हिंदकेसरींचे वंदन घ्यायला लावणार आहात काय ? ज्या शाहूमहाराजांच्या नावाने तुम्ही पुरोगामीत्वाचे ढोंगी राजकारण करता त्या शाहूराजांच्या दहा मुद्रांपैकी नऊ मुद्रांवर जय भवानी लिहिले आहे हे तरी तुम्हाला माहिती आहे का ?  तुमच्याच वळचणीला जन्मलेल्या ब्रिगेड नावाच्या जमातीने त्याच भवानी मातेच्या जयजयकाराऐवजी जिजाऊंच्या जयजयकाराचा आग्रह सुरू केला होता महाराष्ट्रात. हिंदू दैवतावर आघात करण्यासाठी त्या देवतेची मातब्बर भक्ती करणाऱ्या जिजाऊ माँसाहेबांचा वापर केला तुमच्या चेल्या-चपाट्यांनी हे काय आम्ही विसरलेलो नाही अजून. तुमच्या समाज सुधारकांच्या पूजनाचा मार्ग निदान सर्व सामान्यांच्या श्रद्धा स्थानांच्या हेटाळणीपासून सुरू होऊ नये हीच आग्रही मागणी.

         मित्रहो सांगायचा उद्देश एकच आहे. हिंदू धर्मात असणारी ही सर्व दैवते विविध मानवी सद्गुणांची निर्गुण निराकार नव्हे तर सगुण साकार रूपी प्रतीके आहेत. एकाच ध्येयाने वाटचाल करणाऱ्या विविध मानवी समूहाला नेतृत्व, आधार, शक्ती, प्रेरणा देणाऱ्या प्रतीकरूपी देवता आहेत. महाराष्ट्राच्या भक्तीरूपी विठ्ठलाला भेटायला जाणाऱ्या प्रत्येक वारकरी बांधव-भगिनी ज्या भावनेने पांडुरंगाला पाहतात, पूजा करतात त्याच पवित्र भावनेने प्रत्येक विद्याभ्यासक सरस्वती शारदामातेचे स्तवन तक्षशिला नालंदा इथल्या विद्याकेंद्रांपासून करत आलाय. 

        एवढी सगळी प्रतिके पाहून गडबून जाऊ नका तुमचे आराध्य दैवत श्रीयुत शरदचंद्रजी पवारसाहेब हेही महाराष्ट्रातील एका विशिष्ट गोष्टीचे प्रतिक आहेत. ते एकदा शोधा म्हणजे आपण बाळासाहेब ठाकरे नावाचे दैवत सोडून यांच्या सोबत का आहोत हेही कळून येईल...

सुहास पाटील.

०२/१०/२०२२

खेळ आणि खिलाडूवृत्ती......!

 




महाराष्ट्रात सध्याच पार पडलेली  'महाराष्ट्र केसरी २०२३'  स्पर्धा आपल्या भव्यतेने आणि काटाजोड लढतीने स्मरणीय ठरेल असे मनोमन वाटले होते. पण खरंच दुर्भाग्य म्हणावं महाराष्ट्राचे; इतके मूर्ख आणि निर्बुद्धीने खचोखच भरलेले मेंदू सध्या इतके वाढले आहेत की उभ्या आयुष्यात कधी लंगोट बांधून माहिती नसणारे, तांबड्या मातीच्या आखाड्याचा गंधही माहिती नसणारे महान योद्धे प्रवचनावर प्रवचने झाडू लागले आहेत. मैदानाबाहेरचे पाठीराखे किती आहेत यावर  खेळात विजय मिळत नसतात. अर्धवटांना हेही माहिती नाही की कुस्ती ही काही मेसेजने जिंकायची हास्यसम्राट स्पर्धा नसते. 

        कुस्ती हा एक खेळ आहे आणि यामध्ये उतरणारा एकेक मल्ल हत्तीचे बळ आणि सिंहाची छाती घेऊनच उतरत असतो. तिथे होणाऱ्या लढतीत दयामाया नसते आणि हारजीत पाहून रडायला सवडही नसते. एका फटक्यात मी मी म्हणणाऱ्या कोणालाही दिवसा तारे दाखवण्याची ताकद असूनही मारूतीरायासारखे अतिशय विनम्र असणारे पैलवान पंच आणि वस्ताद यांना गाभाऱ्यातल्या देवाइतके आदराचे स्थान देत असतात. समाज माध्यमातून चाललेल्या या न्याय अन्यायाच्या भाषेने त्या नात्यांना आणि त्या आदरालाच हादरे देण्याचा नीच प्रयत्न केवळ प्रसिद्धीसाठी केला जात आहे म्हणूनच लिहावेसे वाटले.

             मैदानावर काय घडले ,चूक की बरोबर ठरवायला पंच आहेत, तंत्रज्ञ आहेत आणि वस्तादही आहेत. फक्त एक सांगायचं म्हणून सांगावेसे वाटते बाद तर सचिन तेंडूलकरही कित्येकदा नव्हता पण त्याने कधी चुकीच्या निर्णयाबद्दल पंच अथवा नियोजन मंडळावर हेत्वारोप केले नाहीत. शांततेने निर्णय मान्य करून पुढील सामन्यात स्वतःचे उत्तर बॅटने दिले तेव्हा कुठे तो इतिहास घडवणारा खेळाडू बनू शकला. नाहीतर त्याच्याइतकेच तंत्रशुद्ध खेळीचे वरदान विनोद कांबळीलाही होते. विनोद कांबळी नावाचा हिरा केवळ वादग्रस्ततेने झाकला गेला. जीत आणि हार याबाबतीत वादग्रस्त वक्तव्य भले जग करू दे; खेळाडू म्हणून मल्लांनी आपले भवितव्य धोक्यात येईल असे वक्तव्यापासून स्वतःला दहा हात दूर ठेवावे. तर आणि तरच काळाच्या छातीवर तुमचा इतिहास लिहिला जाईल. एक तास वीस मिनिटे लढून नरसिंग यादवना खासबाग मैदानात चितपट करणारे अस्लम काझी महाराष्ट्र केसरी होऊ शकले नाहीत पण तेच नरसिंग यादव महाराष्ट्राचे पहिले ट्रिपल महाराष्ट्र केसरी बनले हाच इतिहास आहे. 

           आणि जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी म्हणवून नको ती भूल देऊ नका कारण अशा भूलीनेच जनतेच्या मनातील अनेक मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी आपल्या भवितव्याची आणि राजकिय प्रगतीची वाट लावून घेतली आहे. सोहनलाल द्विवेदींनी लिहून ठेवलेल्या ओळी प्रत्येक खेळाडूंसाठी दीपस्तंभासारख्या असाव्यात.


असफलता एक चुनौती है, स्वीकार करो

क्या कमी रह गई, देखो और सुधार करो

जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम

संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम

कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती

कोशिश करने वालों की हार नहीं होती....!!


✍🏻

सुहास पाटील


नक्की महत्त्वाचे काय ?

  28 मे 2023 रोजी महिला कुस्तीगीर विनेश फोगट आणि साक्षी मलिक या  लैंगिक अत्याचाराचे आरोप करीत निदर्शन करीत होत्या त्यांना दिल्ली पोलीस रस्त्...