नमस्कार ,मी सुहास रघुनाथ पाटील.... पुणे विद्यापीठात इतिहास विभागात एम ए ला आहे.झाले असे की डिसेंबर मध्ये पेपर झाल्यानंतर गडकिल्ले पहायचे नियोजन आम्ही काही मित्रांनी केले..यामध्ये नारायणगावच्या नारायणगडापासून सुरूवात करून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याच्या दर्शनाने समाप्ती करायची असे ठरले होते.यामध्ये किल्ले शिवनेरी, चावंड, जीवधन, नाणेघाट, निमगिरी, हनुमंतगड, सिंदोळा अशी भरपूर दुर्गरत्ने वेचण्याची उर्मी मनात साठवून ठेवली होती...आणि होता होता सात डिसेंबर ला मित्रांचे सर्व पेपर झाले, माझी सर्व पूर्व तयारी झाली होती, आणि अचानक आमचे एक एक मोहरे गळून पडले आणि सर्व मित्र एकसुरात नकार देऊन मोकळे झाले. पण माझे काय? मी चांगले दोन आठवडे केलेले नियोजन, माझे पेपर संपूनही यांच्यासाठी वाट पाहिलेले आठ दिवस डोक्यात थयथय नाचू लागले. अक्षरशः डोक्यात झिणझिण्या आल्या , तळपायाची आग मस्तकात गेली आणि.....
आणि निघालो एकटाच , आपल्या प्राणप्रिय सह्याद्रीला भेटायला, गडकोटांना बिलगायला ,आणि इतिहासाला अनुभवायला. ७ डिसेंबर सायंकाळी ठीक ६-३५ वाजता ताबडतोब गाडी सुरू केली आणि निघालो नारायणगडच्या दिशेने. चाकण, राजगुरूनगर असे करत मंचर येथून बेल्हे फाट्यावरून उजवीकडे वळण घेऊन खोडदच्या दिशेने जाऊ लागलो. गुगलच्या मदतीने नारायणगडच्या (महानुभवाची कपार) पायथ्याशी असणाऱ्या मुकाई मातेच्या मंदिरात सायंकाळी ठीक ८-५७ ला पोहोचलो. पोहोचताच पिशवी ठेवून साहित्य व्यवस्थित करून पुन्हा एकदा उद्याच्या प्रवासाची उजळणी केली. आणि थोडे बहुत चिरमुरे, फरसाण आणि लाडू खाऊन अंथरूण टाकले . दूरवर लुकलूकणारे दिवे ,पाठीशी गड आणि पायथ्याशी जंगलातील मंदिरात मी; असे काहीसे अद्भुत वातावरण अनुभवत होतो. एवढ्याशा कुत्र्याच्या आवाजात इतकी ताकद असते हे पहिल्यांदाच अनुभवत होतो. चांगले पाच दहा किलोमीटर पर्यंत त्याच्या रडण्याचा आवाज घुमत होता. अधूनमधून कोल्हेकुईही ऐकायला मिळत होती. माझ्या नशिबाने एखादी अजस्त्र डरकाळी किंवा वनराजाची गर्जना ऐकायला मिळाली नाही म्हणून शांत झोप लागली.
पहाटे सहा वाजता तीन तरूण विजेरी घेऊन गड चढू लागले होते. मग मीही उठलो, अंथरूण पांघरूण नीट करून सर्व साहित्य पाठीवर बांधून अंधारातच गड चढू लागलो.अगदी व्यवस्थित बांधलेल्या पायऱ्या असल्यामुळे काहीही अडचण न होता मी अंधारातही गड चढाई करू शकलो. चंद्राच्या शीतल प्रकाशातच नारायणगडाच्या कातळ कोरीव पायऱ्यांचे दर्शन झाले. गडाची उंची मोजकीच असल्यामुळे अवघ्या वीस मिनिटांत गडाच्या सर्वोच्च ठिकाणी असणाऱ्या हस्तमातेच्या मंदिरात पोहोचलो. गडदेवीचे दर्शन घेतले. हळूहळू पहाट होत होती आणि मी त्या रम्य वातावरणात गडाचे कडे, आजूबाजूचा परिसर, खोडद येथील दुर्बीणी पाहून खूश झालो होतो. थोडे आणखी स्पष्ट दिसू लागल्यावर गड उतरण्यास प्रारंभ केला आणि गडाच्या मध्यावर असणारे ऐतिहासिक अवशेष डोळ्यात, मनात आणि मोबाईल मध्ये टिपून घेऊ लागलो. यामध्ये गणेशपट्टी असणारी शिळा, व्याल्याचे शिल्प, वाड्याचे चौथरे, पाण्याच्या टाक्या आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारे नारायण टाके हे पाहिले. उतरताना मघाशीच्या कातळ कोरीव पायऱ्या जास्त स्पष्ट दिसत होत्या, गडाची थोडी शिल्लक असणारी तटबंदी आणि बुरूजही पाहिला आणि गड उतार होऊन मुकाई मंदिराच्या जवळ ७-१३ वाजता पोहोचलो. एकंदरीत किल्ला व्यवस्थित पाहण्यासाठी दीड तास पुरतो.
मुकाई मातेला आणखी एकदा नमस्कार केला आणि आपल्या पुढील प्रवासाला सुरूवात केली. नारायणगाव मार्गे जुन्नरला येऊन शिवनेरी पायथ्याशी पोहोचायला बरोबर 8 वाजले. अखंड हिंदुस्थानात आपल्या दैदिप्यमान इतिहासाने आणि स्वतःच्या पराक्रमाने वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असणाऱ्या किल्ले शिवनेरीच्या प्रथम दर्शनानेच आपल्या धमन्यातील रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही. साडेतीनशे वर्षापूर्वीचा तो इतिहास डोळ्यासमोर उभा राहून तुमच्या अंगी स्वराज्य निष्ठ मावळ्यांची प्रेरणा जागृत होतेच होते. अशा संचारलेल्या बळाच्या जोरावरच मी ते शिवनेरीचे दरवाजे एका पाठोपाठ एक सर करत चाललो. प्रत्येक दरवाजाची ठेवण वेगळी, सौंदर्य वेगळे आणि इतिहास काळातील भेदकताही वेगळीच. अशा एकाहून एक भेदक दरवाजांना पार करत होतो तसतसे दरवाज्यांच्या बांधणीमधून डोकावणारा शिवपूर्वकालीन इतिहास डोळ्यात साठत होता. साधारणतः किल्ल्याच्या मध्यावर गड देवता शिवाई देवीचे मंदिर आहे.कधीकाळी जिजाऊ माँसाहेब ज्या आई समोर नतमस्तक झाल्या होत्या त्या आईला मनोभावे नमस्कार केला. शिवाई देवीचा अष्टकोनी बुरूजात असलेला सुंदर नक्षीकाम केलेला कोरीव दरवाजा अतिशय विलोभनीय आहे. तिथून पुढे कोरीव पायऱ्यांचा मार्ग, पाण्याचे टाके यादवकालीन भव्य गोमुखी दरवाजा लागतो, त्यानंतर आपण गडावर पोहोचताच भव्य अंबारखाना पाहिला अतिशय सुंदर आणि भव्य अशा प्राचीन वास्तूला पाहताना आपणही नकळत भव्य होऊन जातो.
तिथून वर जाताच कड्याच्या बाजूनेच आपली वाटचाल चालू ठेवली .डाव्या बाजूला कड्यालगतच इतिहास काळापासून शिवनेरीची तहान भागवणारी अनेक कातळ कोरीव पाण्याची टाकी दिसली. उजवीकडे गडाच्या सर्वोच्च ठिकाणी कोळी चौथरा ही ऐतिहासिक इमारत दिसली. हे पाहत पुढे जाताच नवीन पद्धतीत बांधलेल्या इमारतीत मध्ये आपल्या डोळ्यासमोर येते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना प्रतिष्ठापना केलेली माँ जिजाऊ आणि बाल शिवबांची सुंदर मूर्ती. ती पाहून पुढे जाताच नजरेस पडली ती कमान मशीद जिच्या पुढील बाजूला जाताच तिच्या खालीच कोरीव गुफेमध्ये असलेली सुंदर इमारत आढळते जी दुर्दैवाने खराब पाण्यात समाधीस्त झाली असून वटवाघळांच्या प्रचंड संख्येने दुर्गंधीयुक्त झाली आहे.खरे तर त्या पाण्याला बाहेर जाण्याचा मार्ग दरीकडील बाजूला आहे.पण तो बंदिस्त झाल्यामुळे हे पाणी तिथेच साचून आपल्यासारख्या दुर्गभक्तांना ती सुंदर इमारत पारखी झाली आहे.आपल्या सारख्या दुर्गभक्तांनी मिळून जर ठरविले तर नक्कीच ती सुंदर इमारत मोकळा श्वास घेईल . तिथून पुढे येताच इतिहास कालीन इमारतीचे चौथरे नजरेस पडतात.ते पाहून पुढे जाताच दिसली ती भव्य इमारत.....
हो तीच इमारत ज्या इमारतीत अवघ्या हिंदुस्थानाच्या इतिहासाला कलाटणी देण्याची धमक ज्यांच्या मनगटात होती त्या छत्रपती शिवरायांनी पहिला श्वास घेतला होता. तीच इमारत जिच्या भिंतींनी अवघ्या महाराष्ट्रातील माय बहीणींच्या फुटणाऱ्या किंकाळ्या तलवारीच्या जोरावर थांबवून मायबहीणींना सन्मानाने जगण्याची उर्मी उत्पन्न करून दिली त्या छत्रपती शिवरायांची जन्मानंतरची पहिली किंकाळी ऐकण्याचे भाग्य लाभले. अशा या महाराष्ट्रातील पवित्र स्थानाला मनोभावे वंदन केले .या इमारतीला पाहून पुढे जाताच लागतो तो बदामी तलाव. अतिशय सुंदर अशा बांधकामाने सजलेला हा तलाव आवर्जून पहावा असाच आहे. तिथून पुढे जाताच आपण शिवनेरीच्या कड्यालगतच्या कडेलोटाच्या ठिकाणी पोहोचतो. तिथून अवघे जुन्नर शहर एका नजरेत सामावून घेता येते. तसेच समोर लेण्याद्रीचा डोंगर अतिशय सुंदर दिसतो. इथे माझी शिवनेरी दर्शनयात्रा पूर्ण केली आणि मी पुन्हा एकदा शिवजन्मस्थानाला मनोभावे वंदन करून परतीला लागलो. ठीक दहा पर्यत गड पायथ्याशी येऊन सर्व साहित्य व्यवस्थित बांधून निघालो आपल्या पुढील प्रवासाला ,आपल्या आणखी एका जीवलगला गळाभेट द्यायला, किल्ले श्री चावंडच्या दिशेने....
(क्रमशः)


















Nice sir...
ReplyDeleteTumch gad kot mohimech swapn sundar ritya paar
Pado hich subhechya.
Vachtana aas vatl ki mi hi tumchya sobt gad
Chaday ahe..khup chan sir.....👍
धन्यवाद
Delete