Monday, June 10, 2024

नक्की महत्त्वाचे काय ?

 


28 मे 2023 रोजी महिला कुस्तीगीर विनेश फोगट आणि साक्षी मलिक या  लैंगिक अत्याचाराचे आरोप करीत निदर्शन करीत होत्या त्यांना दिल्ली पोलीस रस्त्यावरून ओढून घेऊन गेले तेव्हा अनेक लोकांना यात काहीच गैर वाटले नाही आणि 2 दिवसांपूर्वी नवनिर्वाचित खासदार,बॉलिवुड अभिनेत्री कंगना राणावत यांना शेतकरी आंदोलनावर केलेल्या टिपण्णीवरून एका CISF जवान महिलेने कानाखाली मारली तेव्हा अनेकांना या गोष्टीचे वाईट वाटले. घटना, काळ, व्यक्ती सापेक्ष भूमिका बदलणाऱ्या लोकांपासून आपण चार हात लांबच राहिले पाहिजे. या देशातील प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक जिविताचे व अभिव्यक्तीचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहेच पण ही घटना राजकिय पाठबळ असणाऱ्या प्रत्येकाला एक सूचना देणारी आहे की शेवटी जनसामान्यांचा राग हा कोणत्याही प्रकारे बाहेर येवू शकतो त्यामुळे आपली विधाने विचारपूर्वक कोणत्याही समजाघटकाला दुखावणार नाहीत अशीच करावीत कारण वाचाळवीर म्हणून तुम्हाला राजकीय पक्ष आश्रय देऊ शकतात परंतु तुम्ही उच्च पदावर बसलेला असला तरी भारतीय जनता तुम्हाला कधीच स्वीकारणार नाही.

🇮🇳 जय हिंद 🇮🇳


साभार = प्रतीक गायकवाड 

              सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

              Facebook Wall.



प्रिय मित्र प्रतीक,


नुकतीच तुझी ही पोस्ट वाचनात आली. वैयक्तिक आयुष्यातील काही धावपळीमुळे सविस्तर व्यक्त होता आले नाही आणि 'तुकाराम शिंदे' यांना दिलेला शब्द पाळावा म्हणून...

   सर्वात प्रथम म्हणजे ज्या दोन घटनांना तुझ्या पोस्टमध्ये लिखित केले आहेस, त्या पूर्णतः भिन्न टोकाच्या आणि तुलना न होणाऱ्या गोष्टी आहेत. मुळात पहिली घटना ही कायदेशीरपणे आंदोलनावर केली गेलेली कारवाईची आणि दुसरी घटना ही  सेवेवर रुजू असणाऱ्या व्यक्तीने मर्यादेचे उल्लंघन करणारी होती. त्यामुळे या दोन्हीबाबत तुझ्या लेखी 'ज्यांना' जे काही वाटले असेल ते वेगवेगळे असण्याची शक्यता नक्कीच आहे. पण तू मात्र त्यांना एकाच कंसात बांधले आहेस, तसं नसतं तर दोन्ही गोष्टींचा सहसंबंध जोडण्याचा प्रयत्न तुझ्याकडून झालाच नसता. 

      तुझ्या लिखाणाप्रमाणे सदर घटनेमुळे 'काही लोकांना' वाईट वाटले, पण काही लोकांना आनंदही झालाच ना? पण त्या आनंदित व्यक्तींचा नामोल्लेख नसल्यामुळे तुझी पोस्ट ही वाईट वाटलेल्यांना उद्देशून आहे हे स्पष्ट होते. खरे तर कंगना राणावत या अभिनेत्रीने शेतकरी विरोधी दिलेली वक्तव्ये ही कोणत्या वेळी दिली होती? आणि त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया म्हणून कानशिलात लगावणाऱ्या सी.आय. एस. एफ. जवान महिलेने त्यावेळी त्या वक्तव्यावर काय नाराजी व्यक्त केली होती? हे  शोधण्याचा एक इतिहासाचा विद्यार्थी नक्कीच प्रयत्न करेल. कारण सहा महिन्यांपूर्वी तू मला अमुक-अमुक बोललास म्हणून आज मला प्रचंड राग आला आहे आणि मी आता त्यावर व्यक्त झालो, तर भांडण सोडवायला आलेला माणूस पहिल्यांदा माझ्या तब्येतीची विचारपूस करेल. कधी पासून होतंय असं? वगैरे वगैरे.  दुसरी गोष्ट "विचारांचे उत्तर विचारांनीच दिले पाहिजे" असे वर्गामध्ये ठामपणे मांडणारा माझा प्रतीक गायकवाड नावाचा मित्र कुठे गायब झाला? अगदी अचानकपणे...!!  कारण ती लावलेली कानशीलात एका कंगना राणावतचा अपमान करणारी नव्हती तर तिला मतदान करणाऱ्या मतदारांना अपमानित करणारी होती. श्रीलंकेत केवळ एका राजीव गांधी या व्यक्तीचा अपमान झाला नव्हता तर भारताच्या पदसिद्ध प्रधानमंत्रीचा अपमान झाला होता. एका माथेफिरूने केवळ शरद पवारांचा अपमान केला नव्हता तर भारत देशाच्या कृषी मंत्री पदाचा अपमान केला होत. मग काही वैधानिक मुद्दा मांडणारे हे म्हणतील की कंगनाने अजून शपथ कुठे घेतली आहे?  नसेल कंगनाने घेतलेली शपथ, पण ती त्या सेवेवर असणाऱ्या महिला जवानाने तर घेतली असेल?


 'शेतकरी विरोधी विधाने करणारी कंगना राणावत निवडून येऊ नये' ही असणारी प्रबळ इच्छा एक निराळी गोष्ट आहे आणि ती निवडून आल्यानंतर जनमताच्या त्या निर्णयाचा सन्मान ठेवणे ही एक निराळी गोष्ट आहे.  


     "घटना, व्यक्ती, काळ सापेक्ष भूमिका बदलणाऱ्या लोकांपासून आपण चार हात दूर राहिले पाहिजे" असे  तू प्रामाणिकपणे नमूद केले आहेस, पण कंगनाच्या कानशिलात लगावल्यावर वाईट वाटणाऱ्यांना उद्देशून जसे तू बोलला आहेस तसे आनंदित होणाऱ्या लोकांनाही थोडेफार झोडले असतेस तर मात्र मी नक्कीच तुझं अभिनंदन केलं असतं, मग तुझे विचार तुझी मांडणी ही सुद्धा घटना, व्यक्ती आणि काळ यानुसार बदललेली नाही हे मी मनापासून आनंदाने मान्य केले असते. "प्रत्येक व्यक्तीच्या जीवीताचे आणि अभिव्यक्तीचे संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहेच" असे म्हणत असताना ते कर्तव्य सरकार ज्या प्रशासनाच्या मदतीने बजावत असते, त्याच प्रशासनाचा घटक असणारी सदर महिला स्वतःच्या मर्यादेचे उल्लंघन करते आहे हे नकळतपणे का होईना तुला मांडता आले नाही. पुढे असे म्हणत आहेस की "ही घटना राजकीय पाठबळ असणाऱ्या प्रत्येकाला एक सूचना देणारी आहे की जनसामान्यांचा राग कोणत्याही प्रकारे बाहेर येऊ शकतो." मात्र मित्रा, हे तुझे वाक्य एका अराजकाला खतपाणी घालणाऱ्या विचारधारेचे द्योतक आहे, कारण जनतेचा राग हा केवळ मतपेटीतूनच व्यक्त व्हावा यासाठीच तर घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येकाला समान मताचा अधिकार दिला आहे. आणि तो व्यक्त झाल्यानंतरही जर तुमचा राग शमत नसेल तर मात्र तुम्हाला तुमच्या घटनेवरती विश्वास राहिला नाही हे तुम्ही मान्य करत असता. त्याचाच पुरावा पुढच्या वाक्यात तू देऊन मोकळा झालास. पदसिद्ध असणाऱ्या व्यक्तीला तारतम्याने वागले पाहिजे, बोलले पाहिजे ही माफक अपेक्षा नक्कीच प्रत्येक भारतीयांची आहे. पण वाचाळवीर हे एक सार्वत्रिक विशेषण असणाऱ्या शब्दाचा आधार घेऊन 'जनतेने बहुमताने निवडून दिलेल्या व्यक्तीला ती सी. आय. एस. एफ. ची जवान स्वीकारणार नाही' याच आशयाचे मोठ्या गुणोत्तराने वर्णन करून मांडले आहेस. 


    इतके विस्तृत केलेले माझे  विवेचन कंगनाचे समर्थन करणारे नाही, तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सावधपणे आपण व्यक्त झाले पाहिजे असे मांडण्यासाठी आहे. कारण आज एक जवानाचा राग केवळ कानशीलावर व्यक्त झाला आहे. कामाचा ताण कोणावर नसतो? तो कितीतरी बंदूकधारी सेवा दलातील व्यक्तीवर असतो, तसाच हजारो जीवन वाहून नेणाऱ्या आगगाडीच्या चालकवरही असतो. तो ताण रागातच व्यक्त झाला पाहिजे किंवा होईल अशी सक्ती थोडीच  आहे ?  त्या तणावाला,रागाला, नकारत्मकतेला विधायक वाट दाखवणे हे आपले लक्ष्य असले पाहिजे असे माझे मत आहे.

धन्यवाद.



पुणे 

10/06/2024


No comments:

Post a Comment

नक्की महत्त्वाचे काय ?

  28 मे 2023 रोजी महिला कुस्तीगीर विनेश फोगट आणि साक्षी मलिक या  लैंगिक अत्याचाराचे आरोप करीत निदर्शन करीत होत्या त्यांना दिल्ली पोलीस रस्त्...