श्री चंदन-वंदनच्या भेटी नंतर आम्ही निघालो जलमंदिराचे धन आपल्या कातळात जपणाऱ्या किल्ले श्री नांदगिरी उर्फ कल्याणगडच्या दिशेने.पायथ्याहूनच आकाशात झेपावलेल्या नांदगिरीला वर पर्यंत कच्चा गाडीरस्ता आहे. त्यावरून जसजसे वर जाऊ लागलो तसतसे माझ्या मित्राला हायसे वाटू लागले. दरवाजा पाहताच त्याचा चेहरा आनंदाने भरून गेला. वाटेत एका वळणावर आम्हाला पवनचक्की अगदी जवळून पाहता आली. तिथून मग महादरवाजाच्या दारातच गाडी थांबविली. थोड्या चढाईनेच महादरवाजा पार करताच एक वाट डावीकडे गुहामंदिराकडे उतरते. तिथे जाऊन साहित्य बाहेर ठेवून आत गेलो. अतिशय थंड पाणी , पूर्णतः अंधाराने भरलेली गुहा,खाली वाकून केलेली वाटचाल असे शंभर फूट आत गुहेमध्ये जावे लागते,सारेच थरारक आपण कधी ना कधी हा थरार अनुभवायलाच पाहिजे. मित्र बाहेर बसल्यामुळे मी मोबाईलच्या प्रकाशात आत जाऊ लागलो. शंभर पावले चालून जाताच आतमध्ये भगवान पार्श्वनाथांची,एका देवतेची आणि श्री दत्तात्रयांची सुरेख मूर्ती आहे.त्यांचे दर्शन घेऊन गुहामंदिरातून बाहेर आलो. तिथून आणखी वर येताच गडाचा दुसरा पुर्वाभिमुख दरवाजा लागतो, एक मारूतीरायाचे मंदिर तिथेच असून त्याला नमस्कार करून गडमाथ्यावर प्रवेश करता झालो. गडावर एक पाण्याचे बांधीव टाके आणि एक इतिहास कालीन इमारत इतके अवशेष आहेत. इतर अवशेष झुडूपांनी आपल्या ताब्यात घेतले असून अनोखे गुहामंदिर जपणाऱ्या कल्याणगडला आपण दुर्गभक्तांनीही जपले पाहिजे. संपूर्ण गडदर्शन करून आम्ही परतीच्या वाटेला लागलो.पहिला गड पहायला मिळाल्याचे समाधान माझ्या मित्राच्या चेहऱ्यावर दिसत होते.त्याच समाधानात आम्ही किल्ले श्री वर्धनगड कडे निघालो .
पाऊण तासातच आम्ही श्री वर्धनगडच्या पायथ्याशी असणाऱ्या त्याच्याच नावाने वसलेल्या गावामध्ये पोहोचलो. सूर्य मावळतीकडे झुकला होता. पण आमची इच्छा अजूनही भरात होती.आम्ही गड चढायला सुरूवात केली. गड चढताना उजव्या बाजूला गडाची सावली हळूहळू अख्खे गाव आपल्या कब्जात घेत होती. मनात आले ,या गावाला दररोज जगाच्या सूर्यास्ताआधी एक तास आधीच सूर्यास्त अनुभवास येत असेल. अशाच विचारात अगदी सोप्या चढाईने श्री वर्धनगडाच्या गोमुखी आकाराच्या महादरवाजात पोहोचलो. अतिशय भक्कम अशा बांधणीच्या दरवाजाचे रूप डोळ्यांत साठवून पुढे वाटचाल सुरू ठेवली. वाटेत मारूतीची मूर्ती ,महादेवाचे मंदिर आणि खोदीव पाण्याचे टाके लागते.ते पाहून सर्वोच्च ठिकाणच्या वर्धनीमातेच्या मंदिराचे दर्शन घेतले. तिथून खाली उतरून गडाच्या दक्षिण तटबंदीत असणारा छोटा चोरदरवाजा पाहिला.अतिशय सुस्थितीतील वर्धनगडच्या तटबंदीवर काही ठिकाणी झाडे आणि झुडपे उगवली आहेत ती वेळीच काढली पाहिजेत . तटबंदीचे बांधकाम काय मजबूतीने केले आहे ते त्या तटबंदीवरून चालतानाच जाणवते. सूर्यदेव ढगांशी झुंज देत देत क्षितिजाच्या आड जात होते आणि आम्ही त्या संधी प्रकाशात गडउतार होऊ लागलो.
आता ध्येय होते किल्ले श्री महिमानगडाचे. सायंकाळ झाली होती.हळूहळू काळोख आपले साम्राज्य वाढवत होता आणि आम्ही महिमानगडच्या दिशेने सुसाट सुटलो होतो. रहिमतपूरच्या सुनिल निकम यांनी दिवसभर आम्हाला कॉल करून योग्य त्या सूचना काळजीपूर्वक दिल्या होत्या . त्यांच्या प्रेममय सूचना आम्हाला दिशा दाखवत होत्या . महिमानगड गावी पोहोचायला सायंकाळचे साडे सहा वाजून गेले होते आणि पूर्ण अंधार पसरला होता. पायथ्याशी असणाऱ्या एका घरी विचारपूस करून वर गडावर जायचे नक्की केले. माझ्या मित्राने तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला .पूर्ण अंधार ,दिसत काही नव्हते ,गड चढाई अगदी थोडीच असली तरी अनोळखी होती. काका विचारले "आता अंधारात काय पाहणार तिथे जाऊन ? " मी म्हटलं " गडाच्या दरवाजाला नमस्कार करून येईन , गड देवतेला पाया पडून येईन पण जाऊन येईनच .." असे म्हणून मी एकट्यानेच गड चढायला सुरूवात केली.
त्या झुडूपातून जाणाऱ्या वाटेवरून जाताना मनात आले "गड फक्त पहायलाच यायचे असते का ? ...नाही नाही ...कधी कधी गड अनुभवायचाही असतो. भर रात्रीत गड सर करणाऱ्या शिवरायांच्या हेराला काय अनुभव येत असेल ? भर रात्री कोंढाण्याच्या डोणागिरी कड्याखाली जमलेल्या तीनशे भुतांना काय अनुभव येत असेल ? भर पावसात भर रात्री पन्हाळ्याहून स्वराज्याच्या धन्याला नेणाऱ्या सहाशे मावळ्यांच्या काळजात काय तरंग उमटत असतील.? हे सगळे सगळे आठवत मी एकटाच त्या रात्री किल्ले श्री महिमानगडच्या दरवाजात पोहोचलो . मोबाईल टॉर्चच्या प्रकाशातच त्याच्या भक्कम तटबंदीचे दर्शन घेतले.कधीकाळच्या बलदंड बाहूच्या मावळ्यांनी ज्याचे संरक्षण केले त्या दरवाजाला नमस्कार केला. आणखी थोडे वर जाऊन मारूतीरायाला वंदन केले. दूरवर असंख्य दिवे लुकलुकताना महिमानगडावरून पाहणे खूपच रोमांचकारी होते. ते पाहिले आणि गडउतार झालो.
तिथून मग रहिमतपूर गावी असणारे आणि सह्याद्रीच्या कृपेने नवीनच मित्र बनलेल्या डॉ.श्री सुनिल निकम यांना भेटण्यास गेलो.त्यांचा जिव्हाळा इतका अपार की त्यांनी दिवसभर मला प्रत्येकवेळी प्रत्येक ठिकाणी फोनवरून काळजीपूर्वक सूचना दिल्या आणि काहीही करून भेटीस येण्याचा प्रेममय आदेश दिला.त्यांना भेटलो गडकोटांच्या भ्रमंतीच्या चर्चेमध्येच आमची पंगत बसली आणि सह्याद्रीच्या शिरावरील मुकूटासमान एक एक दुर्गवारीचे त्यांचे बोल मनात साठत राहिले.सह्याद्रीच्या आणि महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला एक जीवलग मिळाले होते.आणि त्यांच्या श्रीवंदनच्या संवर्धन मोहिमेत सहभागी होण्याचा शब्द देऊन त्यांचा निरोप घेतला आणि आम्ही आमच्या गावी सुखरूप पोहोचलो.
(टीप - दिनांक १७-१२-२०१९ रोजी आमची किल्ले श्री चंदन-वंदन ,श्री नांदगिरी ,श्री वर्धनगड ,श्री महिमानगड ही सातारा जिल्ह्यातील पाच दुर्गांची दुर्गवारी संपन्न झाली.)
समाप्त





































































