Tuesday, April 30, 2024

मोदी शाह अजिंक्य नाहीत.



         हे एक त्रिकालाबाधित सत्य आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अजिंक्य नाहीत; अमर तर त्याहून नाहीत. या दोघांना पराभूत झालेलं पाहण्यासाठी कोट्यवधी लोक देव पाण्यात घालून बसायलाही तयार आहेत. आजवरच्या राजकीय प्रवासात या जोड गोळीने अनेक छोटे मोठे पराभव पाहिले आहेत, पचवले आहेत. पण त्याचा अभ्यास करून पुन्हा आपण विजयी कसे होऊ यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले आहेत. ते असल्या कुठल्याही भ्रमात नाहीत, की आपण एका मोठ्या राजवंशाचे वंशज आहोत, ही समोरची जनता आपण जिवंत असेपर्यंत तह-हयात आपल्यावर असेच प्रेम करत राहील, मत देत राहील; आणि म्हणूनच ते 2014 च्या पूर्ण बहुमताच्या विजयानंतर स्वस्थ न बसता पश्चिम बंगालमध्ये आणि ईशान्यकडील राज्यांमध्ये आपल्या भाजपचा विस्तार पुन्हा कसा होईल यासाठी कार्यरत राहतात. 2019 च्या तीनशे तीन जागा मिळवूनही स्वस्थ न बसता 2024 साठी तमिळनाडू केरळ तेलंगणा यासारख्या दक्षिणेकडील राज्यात घोडदौड करत राहतात. हे अपार कष्ट त्यांच्या अधून मधून मिळणाऱ्या प्रचंड मोठ्या विजयाचे खरे गमक आहे.

    इसवी सन 2002  साली  उदयाला आलेल्या नरेंद्र मोदी या व्यक्तिमत्वाला सतत संपविण्याचा प्रयत्न करूनही ही व्यक्ती दिवसागणिक मोठी का होत जाते? याचे उत्तर त्यांना मोठे करणाऱ्या विरोधकांना सापडेनासे झाले आहे आणि म्हणून ते वैचारिक दृष्ट्या नैराश्यग्रस्त होऊन, द्वेष भावनेने अगदी निंदानालस्ती करण्यासही मागेपुढे पाहेनासे झाले आहेत. आणि मग आपण पूर्ण बळ एकवटून सुद्धा जेव्हा प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकत नाही अशावेळी त्याला त्रास देणे एवढेच त्यांच्या हाती उरते. त्याची कोंडी करणारे छोटे मोठे लढवय्ये त्यांना आपले तारणहार वाटू लागतात आणि म्हणूनच कधी कन्हैया कुमार, कधी हार्दिक पटेल, कधी विश्वंभर चौधरी, निखिल वागळे, मनोज जरांगे आणि ध्रुव राठी, "लाव रे तो व्हिडीओ" म्हणणारे राज ठाकरे यासारखे प्रत्यक्षात लढाईत नसणारे योद्धे त्यांना सेनापती वाटू लागतात आणि मग हे आपला प्रतिस्पर्धी पराभूतच होणार, हे दिवा स्वप्न पाहण्यात ते मश्गुल राहतात. 

    नरेंद्र मोदी 100% परिपूर्ण नाहीत हे त्यांच्या समर्थक आणि चाहत्यांनाही माहिती आहे. त्यांनी आमच्या घरावरती सोन्याची कौले चढवावीत, आम्हाला फक्त बसून खायला मिळाले पाहिजे, असे कोणाचेही म्हणणे नाही. आम्ही स्व-कष्टाने जे काही मिळवतो, कमावतो त्यातील थोडा बहुत हिस्सा कर म्हणून सरकारला द्यावाच लागतो, याची प्रत्येकाला कल्पना आहे. फक्त द्यावा लागलेला हिस्सा प्रामाणिकपणे कारणी लागला जावा, एवढीच माफक अपेक्षा असते. आमच्या कष्टातील रक्कम कर म्हणून घ्यावी आणि त्याचा भ्रष्टाचार करून चैन करावी, असे चित्र जनतेला ज्या क्षणी दिसेल; त्या क्षणी ही जनता अगदी कोणीही असला तरी सिंहासनावरून खाली घेतल्याशिवाय राहत नाही. राजा इतिहास घडवत नसतो, तर जनता इतिहास घडवत असते आणि जनताच त्यांच्यावरती राज्य करणारे राज्यकर्ते निर्माण करत असते. 

     आणीबाणीच्या कालखंडामध्ये केलेल्या हुकूमशाही वर्तनाची शिक्षा म्हणून जनतेने स्वतः इंदिरा गांधीनाही पराभूत केले, पण त्यानंतर सत्तेवर आलेल्या 'जनता आघाडी'ला संपूर्ण पाच वर्ष सरकार टिकवता आले नाही. म्हणून त्याच जनतेने पुन्हा संपूर्ण देशाची सूत्रे हुकुमशहा म्हणवल्या गेलेल्या इंदिरा गांधींच्याच हाती बहुमताने सुपूर्द केली. इंदिरा गांधींनी त्यावेळी केलेली घोषणा काय होती माहिती आहे? "चलने वाली सरकार". आज नरेंद्र मोदी दुसरे काय सांगत आहेत ? "भारताच्या विकासासाठी मजबूत सरकार", मग जनता का म्हणून यांना मत टाकणार नाही? आज विरोधातील एकतरी पक्ष बहुमताचे नाव तरी काढत आहे का ? 

     'मोदींना पूर्ण शंभर टक्के जनतेचा पाठिंबा आहे', असे मी तरी म्हणणार नाही. अहो, पण मोदीच कशाला? तुम्ही सांगा; गांधी, नेहरू,  लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी यांना तर कुठे 100% जनतेचा पाठिंबा होता?  मुळात 100% बहुमत अशी काही संकल्पनाच लोकशाहीत नसते. 51% मते मिळवले तर त्याला शंभर टक्के सत्ता प्राप्त होते आणि 49% मिळवून सुद्धा तो सत्तेपासून वंचित राहतो. आणि मग यामध्ये बहुमताला महत्त्व प्राप्त होते. आणि ते आज नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भाजपच्या बाजूला आणून उभे केले आहे, हे सत्य तुम्ही स्वीकारले तर होणाऱ्या वेदना थोड्या कमी होतील.

    'फक्त 37.36% लोक भाजपला मत टाकतात' असे जेव्हा विरोधक बोलतात, तेव्हा हेही त्यांनी सांगितले पाहिजे की, त्यापेक्षा कमी  19.49% लोक हे काँग्रेसला मतदान करतात. सुमारे 23 कोटी मतदार भाजपच्या बाजूचे असतील, तर बारा कोटी लोक हे काँग्रेसच्या बाजूचे आहेत. हे बारा कोटी लोक असंतुष्ट असतील, तर या बारा कोटी लोकांचा आवाज हा मोठा असणारच, पण म्हणून त्याचा परिणाम त्या 23 कोटी मतदारांवरती होईलच असे नाही ना? कारण 'काँग्रेसचे धोरण हे देशहितासाठी, समाज हितासाठी आहे' हे त्या 23 कोटी मतदारांना पटविण्यात काँग्रेस अपयशी ठरते आहे.

    जनता निवड करत असताना नेहमी प्रमाणबद्धता या पद्धतीचा वापर करत असते. तिला ना नरेंद्र मोदी 100% बरोबर वाटतात, ना शंभर टक्के राहुल गांधी चुकीचे; पण  ज्या प्रमाणात नरेंद्र मोदी बरोबर वाटताहेत तिथपर्यंत राहुल गांधी पोहोचतच नाहीयेत. आणि म्हणून जनता नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून देत आली आहे. 'अमुकपेक्षा तमुक बरा' एवढाच विचार निवडून देत असताना जनतेच्या मनामध्ये असतो. म्हणूनच तर तुम्ही सर्वसामान्य जनतेला विचारले तर "हे सगळे राजकारणी सारखेच आहेत" असे उत्तर देते. या जनतेला आपल्या बाजूला वळविण्यासाठी तुम्ही पुन्हा पुन्हा मोदींच्या अपयशावर बोट ठेवत राहणार आणि मोदींचे समर्थक त्यांच्या कर्तृत्वाचे ढोल वाजवत राहणार. त्यांचे अपयश जोपर्यंत कर्तृत्वापेक्षा मोठे होत नाही, तोपर्यंत तुम्ही मोदीजींबद्दल जनतेच्या मनात नाराजी निर्माण करू शकत नाही. या सर्वांमध्ये मोदींचे अपयश झाकोळले जात आहे का? तर अजिबात नाही. जनता स्पष्टपणे सांगत आहे "बेरोजगारी ही देशासमोरची मोठी समस्या आहे", पण या बेरोजगारीला दूर कोण करू शकतो? हे जनता ठरवत असताना मोदी हे राहुल गांधींपेक्षा आश्वासक वाटतात. आज आपल्या शेजारी राष्ट्रांची  काय अवस्था आहे? आणि आपली काय आहे? याचीही तुलना ती जनता करत असते. स्वयंरोजगाराच्या ज्या नवनवीन संधी 2014 पासून 2024 पर्यंत निर्माण झाल्या त्या डोळेझाक करून चालणार नाही.  2014 पर्यंत छोट्या-मोठ्या चायनीज वस्तू पाहून ज्यांना वेदना होत होत्या, त्या कुठच्या कुठे पळून गेल्या आहेत. संसार उपयोगी प्रत्येक वस्तू वरती आता मेक इन इंडिया चा सिंहाचा लोगो त्यांना अभिमानाची जाणीव करून देत असतो. मोबाईल आयात करणारा आपला देश, आता तो निर्यात करू लागला आहे हे समजताच त्याला आनंद होऊ लागतो. राज्य आणि राज्यव्यवस्था चालवताना कोणता तरी निर्णय घेणे आवश्यक असते आणि तो वेळेवर घेणे हे त्याहून अधिक आवश्यक असते. ए. के. अँटोनी सारख्या देशाच्या संरक्षण मंत्र्याने भर लोकसभेत "चीनच्या सीमेजवळ विकास न करणे हेच आमचे धोरण आहे" असे आत्मघातकी विधान उच्चारलेले जेव्हा देशाचा विचार करणाऱ्या सर्व सामान्य व्यक्तीच्या कानावरती येते, तेव्हा ती व्यक्ती आपसूक तुमची विरोधक बनून जाते.

    पुढचा मुद्दा आहे महागाईचा. तर होय काही गोष्टी म्हणण्यापेक्षा सर्वच गोष्टी महाग झालेल्या आहेत; अगदी राहुल गांधींचे आश्वासन सुद्धा 72 हजारावरून एक लाखावर येऊन पोहोचले आहे. मग जनतेला हे दिसतेच की गेल्या पंचवार्षिक ला 72 हजार रुपये देणारा माणूस, आज एक लाख रुपये द्यायला का तयार होतोय? तर पाच वर्षांपूर्वी ज्या मतदाराची किंमत 72 हजार ठरवली गेली, त्याची किंमत आज एक लाख झाली आहे, हे तुम्हीच मान्य करताय. मग बाकीच्या वस्तू तुम्हाला 2019 च्या दरात कशा काय बरे पाहिजे आहेत? जनतेला हे कळत नाही का? की जगामध्ये दोन राष्ट्रांमध्ये युद्ध चालू आहे. 2019 मध्ये जगभरात कोरोना सारखी महामारी पसरली होती. कोरोना नंतरच्या जगात आपल्या शेजारची श्रीलंका, पाकिस्तान, भूतान, नेपाळ यासारखी राष्ट्रे आर्थिक दृष्ट्या मेटाकुटीला आली. असे असताना सुद्धा भारतात मात्र 80 कोटी लोकांना मोफत धान्य पुरविले गेले. त्या जनतेला हे माहीत नाही का? मनमोहन सिंग सरकारच्या कालखंडामध्ये धान्य पावसात भिजवले गेले, अक्षरशः कुजले; पण लोकांना वाटले गेले नाही, अगदी सुप्रीम कोर्टाने सांगून सुद्धा. मग इथे प्रश्न निर्माण होतो तुमच्या धोरणांचा आणि मग तुमची धोरणे ही जनतेला आवडेनाशी होतात. मतदान हे आवडीनुसार पडणारी गोष्ट आहे मग जनतेला आवडणाऱ्या गोष्टी करणाऱ्या नेत्याला जनता तितकीच भरभरून मते देते. 

     आम्ही कशाही प्रकारच्या मार्गांचा अवलंब करू आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे मात्र, राजा हरिश्चंद्र, प्रभू रामचंद्र आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रमाणे न्याय आणि नीतीला धरूनच राजकारण करतील. ही अपेक्षाच मुळात चुकीची आहे. "आम्ही प्रामाणिक वागू आणि आमच्या प्रामाणिकपणावरती भाळून आम्हाला मते पडतील आणि आम्ही सत्तेत येऊ" अशी भोळीभाबडी समजूत नाही त्यांची. तुम्ही आजवर ज्या काही कोलांटउड्या मारल्या आहेत. जी काही हीनातली हीन पातळी गाठून सत्तेसाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले आहे. त्या सर्वांचा हिसाब किताब पूर्ण करण्यासाठीच आम्ही त्याच पातळीवरती जाऊन राजकारण करायला मागे पुढे पाहणार नाही अशीच ग्वाही त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणातून दिली आहे. 2019 मध्ये भाजप आणि शिवसेना या युतीला पूर्ण बहुमता इतक्या जागा मिळून सुद्धा ज्यावेळी भाजपाला सोडून उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले आणि त्यांच्या या सत्ता स्थापनेमुळे ज्यांना ज्यांना म्हणून आनंदाच्या उकळ्या फुटल्या, गुदगुल्या झाल्या. त्या सर्वांना धडा शिकवण्यासाठी आणि त्यांच्या गुदगुल्यांना वेदनेत रूपांतरित करण्यासाठीच शिवसेना आणि राष्ट्रवादी यासारखे मातब्बर असणारे दोन पक्ष उभे फोडले गेले. तसे नसते तर एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांनी भाजपामध्ये सहभागी होऊन सत्ता स्थापन करून आरामात सुखाने राहण्याचा मार्ग चोखाळला असता.

      370 कलम हटवल्यानंतर निर्माण झालेली श्रीनगरच्या लाल चौकातील शांतता ज्यांना दिसत नाही, देशभरात पसरले गेलेले महामार्गांचे जाळे ज्यांना दिसत नाही, भादलासारखा सौर ऊर्जेपासून वीजनिर्मिती करणारा जगातील सर्वात मोठा प्रकल्प ज्यांना दिसत नाही, भारतामध्ये वाढलेले ऑनलाईन UPI  ट्रांजेक्शन ज्यांना दिसत नाही, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचलेली अर्थव्यवस्था ज्यांना दिसत नाही, 140 कोटी लोकांना मोफत पुरवली गेलेली विक्रमी वेळेतील कोरोना लस ज्यांना दिसत नाही, एका देशाचा प्रधानमंत्री आपल्या देशाच्या प्रधानमंत्रीच्या पायाशी झुकतो हे ज्यांना दिसत नाही, भारताच्या सीमावर्ती भागात सैन्यासाठी उभारले गेलेले मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर ज्यांना दिसत नाही, शत्रू देशाच्या नाकावर टिच्चून केवळ दोन दिवसांमध्ये आणला गेलेला अभिनंदन वर्धमान ज्यांना दिसत नाही, गेल्या दहा वर्षात वीज पुरवठ्याबाबत सुधारलेली परिस्थिती ज्यांना दिसत नाही, श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर कोट्यवधी हिंदूंच्या दुखऱ्या वेदनेवरती घातलेली फुंकर ज्यांना दिसत नाही, अशा सगळ्या झोपेचं सोंग घेणाऱ्या मनोरुग्णांची मोदी शाह फिकीर करतीलच कशाला?


सुहास पाटील

रेंदाळ

Sunday, April 28, 2024

तीर्थरूप वडील...!


 आज माझ्या तीर्थरूप वडिलांचा श्री. रघुनाथ शामराव पाटील यांचा 60 वा वाढदिवस, 

      या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना, लहानपणी त्यांच्याकडून अथवा इतरांकडून ऐकलेल्या पाहिलेल्या काही गोष्टींना आज उजाळा द्यावा; म्हणूनच हे लेखन करतोय. इतरांप्रमाणेच आयुष्य जगताना त्यांनी अशा काही वेगळ्या वाटा निवडल्या, की त्यांच्यातील निरंतर चळवळी व धडपडी स्वभाव आणि नाविन्याचा ध्यास नक्कीच उठून दिसेल. 

    सुरुवात कदाचित रेंदाळ गावामध्ये 'शिवसेना' शाखा स्थापन होण्यापासून झाली असावी. ज्या काही चार दोन तरुणांनी गावात शिवसेना स्थापन करण्यात पुढाकार घेतला, त्यामध्ये यांचाही सक्रिय सहभाग होता. तत्कालीन राजकारणाला जोड म्हणून सहकारी संस्था काढली जायची, त्यातूनच गावामध्ये 'भवानीमाता दूध संस्थे'चा जन्म झाला. जी संस्था चालविण्याची जबाबदारी यांनी उचलली आणि यशस्वीपणे राबविली. गावात 'शिवजयंती' साजरी करण्यासाठी जी काही जुळणा करावी लागायची, त्यामध्येही पुढाकार असायचा. इतकेच नाही, तर स्वातंत्र्यसैनिक नागनाथ आण्णा नायकवडी यांनी 'रेंदाळ बँके'चा दिला जाणारा 'रेंदाळभूषण' पुरस्कार शिवसेनेच्या तत्कालीन सरपंचांच्या हस्ते घेण्यास नकार दिला. तेव्हा त्यांना खडे बोल सुनावले आणि शिवसेना म्हणजे काय आहे हेही भर सभेत सांगितले, असेही मी ऐकले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा आजही आहे. मी तीन-चार वर्षांचा असतानाच त्यांच्या इचलकरंजी च्या सभेला मला खांद्यावरून घेऊन गेलेले मला आजही आठवते. 

    माझा जन्म 16 ऑगस्ट 1992 चा आणि केवळ तीन महिन्यानंतर झालेल्या '6 डिसेंबर 1992 च्या कारसेवे'साठी हे अयोध्येत गेले होते. त्याठिकाणी झालेल्या घडामोडीचे ते साक्षीदार आहेत. त्यानंतरची आणखी एक घटना जी मी बालपणी नेहमी ऐकली ती म्हणजे रेंदाळमधील तलाठी आणि मंडल अधिकारी यांना अक्षरशः कोंडून त्यांच्याकडून करवून घेतलेले काम. तर झाले असे होते की, माझ्या पणजोबांच्या कै.श्री. महादेव राऊ पाटील या नावाचे दोन व्यक्ती रेंदाळ मध्ये होते. तलाठ्यांच्या हलगर्जीमुळे माझ्या पणजोबांच्या नावे असणाऱ्या शेतजमीनवर दुसऱ्या कै.श्री. महादेव राऊ पाटील यांच्या वारसांची  नावे लागली होती. दोन अडीच वर्षे पाठपुरावा करूनही, मागेल ती कागदपत्रे देऊनही, भ्रष्टाचाराचे पैसे चारल्याशिवाय कामच होत नाहीये हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी हे धाडसी पाऊल उचलले. कदाचित महात्मा गांधींशी आणि गांधीविचारांशी तेव्हा थोडी फारकत असावी. 

    यानंतर  'श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान' हा आणखी एक नवा प्रवास त्यांनी स्वीकारला. आदरणीय 'श्री संभाजीराव भिडे गुरुजी' यांच्या या संघटनेची ओळख श्री. विनोद पाटील (आप्पा) यांच्यामुळे झाली आणि मग त्यांनी त्या संघटनेसाठी स्वतःला वाहून घेतले. गावातून गडकोट मोहिमेसाठी तरुणांना घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेतला. अगदी 2001 साली वढू-बुद्रुक ते रायगड या मोहिमेसाठी रेंदाळ मधून 88 शिवपाईक धारकरी गेले होते. त्यांनी आतापर्यंत 23 गडकोट मोहीम केल्या आहेत. मध्यंतरी सन 2000 सालच्या दरम्यान बाबासाहेब पुरंदरे लिखित 'राजाशिवछत्रपती' ग्रंथाचे 100 रुपये प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख नोंदणी करण्याचा शिवप्रतिष्ठानने संकल्प हाती घेतला. त्यासाठी त्या काळात स्वकर्जातील 40,000 रुपये भरून चारशे ग्रंथांची नोंदणी केली. अवघ्या महाराष्ट्रात शंभरहून अधिक ग्रंथाची नोंदणी करणारे आपले रेंदाळ गाव हे पहिले होते. आजही भिडे गुरुजींना कोणीही रेंदाळ गावाहून आलोय असे कोणी सांगितले तर गुरुजी आवर्जून यांची आठवण काढतात. गावामध्ये दुर्गामाता दौड साठी अनेक तरुणांना उद्युक्त करून, त्यांना देव, देश आणि धर्मासाठी संघटित करण्याच्या चळवळीत स्वतःला वाहून घेतले. ओसामा बिन लादेन दहशतवाद्याने अमेरिकेत हल्ला केलेला तेव्हा आपल्या रेंदाळ मध्ये त्याची अंत्ययात्रा काढली होती त्यामध्येही यांचा पुढाकार होता. काय काय घोषणा दिल्या होत्या ते सहभागी झालेल्यांना अजूनही स्मरणात असतील. रेंदाळ स्टँडवर जो 'भगवा ध्वज' आजही डौलाने फडकतोय त्याची मुहूर्तमेढ रोवण्यातही यांचा सहभाग होता. मी पाचवीला असताना हायस्कूल मध्ये कपाळावर अष्टगंधाचा नाम ओढू नये असा अलिखित नियम बनवण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा पालक मेळाव्यात "अष्टगंध हे कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतीक नसून हिंदू धर्माचे प्रतीक आहे आणि तुम्हाला हिंदू धर्माबाबत आक्षेप असेल तर इथे लावलेले सर्व फोटो काढून ठेवा आणि उद्यापासून संस्थेचे नाव व प्रार्थना बदला" असे बाणेदारपणे सांगितले होते, म्हणूनच पुन्हा कधीच अष्टगंधाविरोधात 'ब्र' काढला गेला नाही. कारण संस्थेचे नाव आणि ते फोटो 'स्वामी विवेकानंद' यांचे होते आणि प्रार्थना 'हरे राम, हरे कृष्ण' अशी होती. त्याचबरोबर हायस्कूल चे मैदान रेंदाळ ग्रामपंचायत च्या नावेच राहावे यासाठी आग्रही भूमिका ठेवली, परिणामी गावातील सैन्यभरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना ते मैदान सहज आणि मोफत उपलब्ध राहिले. मध्यंतरी 'सह्याद्री युथ फोर्स'च्या वतीने रेंदाळ मध्ये नितीन बानूगडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते त्यामध्येही सहभागी होतेच. पुढे6 जून 2008 मध्ये  'शिवराज्याभिषेक समारंभा'साठी रेंदाळ मधून 50 लोक घेऊन रायगडला संभाजी राजे छत्रपती कोल्हापूर यांच्या माध्यमातून गेलेले त्यामध्ये मीही होतो.

     'स्वाभिमानी शेतकरी संघटना' नावाची चळवळ आपल्या भागात जन्माला आली. यामध्ये ही त्यांनी तितक्याच हिरीरीने आणि धडाडीने सहभाग घेतला. ऊस आंदोलनात तत्कालीन माजी खासदारांचीही गाडी अडवून धरलेली रेंदाळकरांनी पहिली होती. अगदी एक गोपनीय गोष्ट म्हणजे, आंदोलन चालू असताना एका कारखान्याला रेंदाळच्या दक्षिणेस असणाऱ्या जंगल मार्गाने चोरून ऊस वाहतूक चालू असताना, गुपचूप रात्री त्या जंगलात लपून, त्या वाहनांवर हल्ला करून, त्यांच्या चाव्या काढून आणल्या होत्या. ज्यांचा मोठा गठ्ठा आमच्या घरी खूप दिवस पडून होता. त्या नंतरच्या काळात हलाखीच्या परिस्थितीत सापडलेले असताना त्यांच्या सर्व जवळच्या मित्रांनी सहकार्य करून एक नवी दूध संस्था स्थापन करून दिली. 'जनसेवा दूध खरेदी विक्री केंद्र रेंदाळ' असे नामकरण करण्यात आले. त्यासाठी प्रामुख्याने प्रदीप बाबाजी पाटील, सुरेश दादा यादव, मोहन पाटील (मेजर), शिवाजी बापू पाटील (रामजी), प्रकाश करवते, कलगोंड लिंगाडे, सुकुमार गंथडे, दत्तात्रय पाटील (किराणा असोसिएशन), रंगराव शंकर पाटील, तानाजी बाबासो पाटील, राजू कोल्हापुरे या आणि असंख्य दूध उत्पादक यांचे खूप मोलाचे सहकार्य त्यांना लाभले. प्रदीप तात्यांच्या मातोश्रींचा जिव्हाळा मला आजही भावविवश करून जातो. 

    जनसेवेचे ब्रीद जपताना त्यांनी रेंदाळ मध्ये 'सर्वपक्षीय कृती समिती'च्या माध्यमातून 'पाण्याच्या मीटर' वरून मोठा संघर्ष उभा केला. वास्तविक त्याच कंपनीचे मीटर आणि इतर साहित्याची एकूण रक्कम सातशे वीस रुपये येत असताना ग्रामपंचायत कडून 1700 च्या आसपास रक्कम आकारली जात होती. तेव्हा ना नफा ना तोटा या तत्वाने त्यांनी कोल्हापुरातून स्वतः जाऊन असंख्य मीटर आणून ती रेंदाळकरांना उपलब्ध करून दिली. त्यानंतर रेंदाळ गावचे ग्रामपंचायतीच्या मालकीचे असणारे माने नगर भागातील 'भूखंड' काही धनदांडगे लुबाडू पाहत होते. तेव्हा ते स्वतः आणि अभिषेक पाटील, महावीर पाटील आणि राजू मुदाळकर हे चौघे उपोषणाला बसले आणि 3 दिवसांच्या उपोषणानंतर त्यांच्या लढ्याला यश आले. त्यावेळी त्यांना "गांधींच्या उपोषणातही ताकद हाय की गा..!"  हे एका मित्राला बोललेले मी ऐकले आहे. गंमत सांगायची तर 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक त्यांनीच गावात सर्वप्रथम गावभागातील जुन्या बिरदेव मंदिरात दाखवले होते. तसेच 'श्री बिरदेव  ग्राम दैवताची यात्रा' भरवली पाहिजे या हेतूने त्यांनी 'बिरदेव यात्रा कमिटी' स्थापन केली. आजही कमिटीच्या खडतर परिश्रमातून आणि बिरुदेवाच्या भक्तांच्या आशीर्वादाने यशस्वीपणे यात्रा थाटामाटात साजरी होत आहे. या सगळ्या व्यापाबरोबरच वक्तृत्व कला जोपासली जावी म्हणून 'विचारवेध व्यासपीठ' स्थापन करून रेंदाळ मध्ये दिवाळी मध्ये वक्तृत्व स्पर्धा किमान 15 वर्षे भरवली जात होती. याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून आतापर्यंत सुमारे '15 वेळा रक्तदान' सुद्धा त्यांनी केले. मध्यंतरी त्यांना 'महात्मा गांधी  तंटामुक्तीचे अध्यक्षपद' सोपवण्यात आले. तेही त्यांनी निस्पृहपणे सांभाळले. गोरगरीब लोक जेव्हा घरी आपले वाद विवाद घेऊन यायचे, तेव्हा त्यांना योग्य तो सल्ला देऊन त्याचे वाद मिटतील कसे यासाठीच प्रयत्न करताना मी पाहिले. आणखी एक चमत्कारिक वाटेल पण रेंदाळमध्ये 'अंत्ययात्रेसाठी घोंगडे'च वापरावे यासाठी जुनी जाणती मंडळी आग्रही असताना लोखंडी  पर्यायी व्यवस्था निर्माण करून खांदेकरी लोकांची होणारी अडचण थांबवण्यातही यांचा पुढाकार होता. आज ती व्यवस्थाच सर्वमान्य झाली आहे. सर्वसामान्यांना अडचणीतून सोडविण्याच्या त्यांच्या स्वभावाची आणखी एक ओळख बऱ्याच जणांना आहे, ती म्हणजे ते देत असणारे 'मुतखड्यावरील आयुर्वेदिक औषध' हे आहे. वास्तविक त्यांनाच एकदा या विकाराचा त्रास चालू झाला होता ऑपरेशन किंवा आयुर्वेदिक औषध ह्यापैकी त्यांनी आयुर्वेदिक औषधाचा पर्याय निवडला आणि त्यातून ते बरे झाले. त्यानंतर ते तेवढ्यावरच न थांबता ते औषध कोल्हापूरहून घरी आणून ज्यांना आवश्यक पडेल त्यांना अगदी मोफत देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आसपासच्या गावातूनच नव्हे तर सीमाभागातून अनेक लोक आजही औषध घेण्यास येतात. आजच्या काळात ही व्याधी अगदी किरकोळ वाटत असली तरी पंधरा वीस वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. ना वाहतुकीची साधने, ना पैशाची उपलब्धता अशी होती. सर्व सामान्य माणूस आजच्या इतकाच त्याही काळात दवाखाने आणि ऑपरेशन यांना घाबरून असायचा. त्या सर्वांना आपल्या परीने दिलासा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. '2005 च्या महापुरात' पूरग्रस्तांना मदत देण्याच्या कार्यातही ते तितकेच अग्रेसर राहिले. विविध गणेश मंडळांना आवाहन करून त्यांनी गणेश मंडळामध्ये मदत देण्यासाठी ईर्षा निर्माण केली. परिणामी पुरग्रस्तांच्या दुःखावर त्यावेळी मदतीची फुंकर घातली गेली. अलीकडेच 22 जानेवारी 2024  रोजी 'श्रीराम  मंदिरातील प्राणप्रतिष्ठा' निमित्त गावातील शोभायात्रेत पण तेवढ्याच उत्साहाने सहभागी झाले.


     या सर्व प्रवासात त्यांनी अनेक सहकारी जोडले, जिवलग मिळवले. थोरामोठ्यांबरोबर लहानांनाही आदराने वागवले. त्या सर्व गावकरी मित्रमंडळाच्या सहकार्यानेच हे सर्व कार्य कमी अधिक प्रमाणात यशस्वी करता येणे शक्य झाले.  एक ऐतिहासिक असे सावरकरांचे वाक्य ते कुणाशीतरी बोलताना मी ऐकले होते "चार काड्या गोळा करून, पिले आणि आपले  दिवसभराचे पोट भरून जगावे असा संसार तर कावळे-चिमण्यांही करतात, आपण माणूस म्हणून जगताना आपला संसार त्याहूनही वेगळा असला पाहिजे".  खरं सांगायचं तर ते तसेच जगत आहेत. तत्वासाठी प्रसंगी अनेकांचा विरोध पत्करला पण तोही दिलदारपणे, द्वेषभावना म्हणून कधीच नाही.  

     आजच्या त्यांच्या या षष्ठी पूर्ती निमित्त त्यांचा प्रवास मला तुम्हाला सांगावासा वाटला. वाढदिवस साजरे करावेत असे त्यांना कधी वाटलेही नाही आणि त्याची आवडही नाही. म्हणूनच  'जनसेवा हीच ईश्वरसेवा' हे व्रत असेच या ना त्या माध्यमातून चालू राहो ही प्रार्थना करतो आणि थांबतो.  


(मांडणी मध्ये काही कमतरता राहिली असली तर ती माझी कमतरता आहे असे समजून क्षमा करावी.)

नक्की महत्त्वाचे काय ?

  28 मे 2023 रोजी महिला कुस्तीगीर विनेश फोगट आणि साक्षी मलिक या  लैंगिक अत्याचाराचे आरोप करीत निदर्शन करीत होत्या त्यांना दिल्ली पोलीस रस्त्...