महाराष्ट्रात सध्याच पार पडलेली 'महाराष्ट्र केसरी २०२३' स्पर्धा आपल्या भव्यतेने आणि काटाजोड लढतीने स्मरणीय ठरेल असे मनोमन वाटले होते. पण खरंच दुर्भाग्य म्हणावं महाराष्ट्राचे; इतके मूर्ख आणि निर्बुद्धीने खचोखच भरलेले मेंदू सध्या इतके वाढले आहेत की उभ्या आयुष्यात कधी लंगोट बांधून माहिती नसणारे, तांबड्या मातीच्या आखाड्याचा गंधही माहिती नसणारे महान योद्धे प्रवचनावर प्रवचने झाडू लागले आहेत. मैदानाबाहेरचे पाठीराखे किती आहेत यावर खेळात विजय मिळत नसतात. अर्धवटांना हेही माहिती नाही की कुस्ती ही काही मेसेजने जिंकायची हास्यसम्राट स्पर्धा नसते.
कुस्ती हा एक खेळ आहे आणि यामध्ये उतरणारा एकेक मल्ल हत्तीचे बळ आणि सिंहाची छाती घेऊनच उतरत असतो. तिथे होणाऱ्या लढतीत दयामाया नसते आणि हारजीत पाहून रडायला सवडही नसते. एका फटक्यात मी मी म्हणणाऱ्या कोणालाही दिवसा तारे दाखवण्याची ताकद असूनही मारूतीरायासारखे अतिशय विनम्र असणारे पैलवान पंच आणि वस्ताद यांना गाभाऱ्यातल्या देवाइतके आदराचे स्थान देत असतात. समाज माध्यमातून चाललेल्या या न्याय अन्यायाच्या भाषेने त्या नात्यांना आणि त्या आदरालाच हादरे देण्याचा नीच प्रयत्न केवळ प्रसिद्धीसाठी केला जात आहे म्हणूनच लिहावेसे वाटले.
मैदानावर काय घडले ,चूक की बरोबर ठरवायला पंच आहेत, तंत्रज्ञ आहेत आणि वस्तादही आहेत. फक्त एक सांगायचं म्हणून सांगावेसे वाटते बाद तर सचिन तेंडूलकरही कित्येकदा नव्हता पण त्याने कधी चुकीच्या निर्णयाबद्दल पंच अथवा नियोजन मंडळावर हेत्वारोप केले नाहीत. शांततेने निर्णय मान्य करून पुढील सामन्यात स्वतःचे उत्तर बॅटने दिले तेव्हा कुठे तो इतिहास घडवणारा खेळाडू बनू शकला. नाहीतर त्याच्याइतकेच तंत्रशुद्ध खेळीचे वरदान विनोद कांबळीलाही होते. विनोद कांबळी नावाचा हिरा केवळ वादग्रस्ततेने झाकला गेला. जीत आणि हार याबाबतीत वादग्रस्त वक्तव्य भले जग करू दे; खेळाडू म्हणून मल्लांनी आपले भवितव्य धोक्यात येईल असे वक्तव्यापासून स्वतःला दहा हात दूर ठेवावे. तर आणि तरच काळाच्या छातीवर तुमचा इतिहास लिहिला जाईल. एक तास वीस मिनिटे लढून नरसिंग यादवना खासबाग मैदानात चितपट करणारे अस्लम काझी महाराष्ट्र केसरी होऊ शकले नाहीत पण तेच नरसिंग यादव महाराष्ट्राचे पहिले ट्रिपल महाराष्ट्र केसरी बनले हाच इतिहास आहे.
आणि जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी म्हणवून नको ती भूल देऊ नका कारण अशा भूलीनेच जनतेच्या मनातील अनेक मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी आपल्या भवितव्याची आणि राजकिय प्रगतीची वाट लावून घेतली आहे. सोहनलाल द्विवेदींनी लिहून ठेवलेल्या ओळी प्रत्येक खेळाडूंसाठी दीपस्तंभासारख्या असाव्यात.
असफलता एक चुनौती है, स्वीकार करो
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो
जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम
संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम
कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती....!!
✍🏻
सुहास पाटील