Sunday, April 28, 2024

तीर्थरूप वडील...!


 आज माझ्या तीर्थरूप वडिलांचा श्री. रघुनाथ शामराव पाटील यांचा 60 वा वाढदिवस, 

      या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना, लहानपणी त्यांच्याकडून अथवा इतरांकडून ऐकलेल्या पाहिलेल्या काही गोष्टींना आज उजाळा द्यावा; म्हणूनच हे लेखन करतोय. इतरांप्रमाणेच आयुष्य जगताना त्यांनी अशा काही वेगळ्या वाटा निवडल्या, की त्यांच्यातील निरंतर चळवळी व धडपडी स्वभाव आणि नाविन्याचा ध्यास नक्कीच उठून दिसेल. 

    सुरुवात कदाचित रेंदाळ गावामध्ये 'शिवसेना' शाखा स्थापन होण्यापासून झाली असावी. ज्या काही चार दोन तरुणांनी गावात शिवसेना स्थापन करण्यात पुढाकार घेतला, त्यामध्ये यांचाही सक्रिय सहभाग होता. तत्कालीन राजकारणाला जोड म्हणून सहकारी संस्था काढली जायची, त्यातूनच गावामध्ये 'भवानीमाता दूध संस्थे'चा जन्म झाला. जी संस्था चालविण्याची जबाबदारी यांनी उचलली आणि यशस्वीपणे राबविली. गावात 'शिवजयंती' साजरी करण्यासाठी जी काही जुळणा करावी लागायची, त्यामध्येही पुढाकार असायचा. इतकेच नाही, तर स्वातंत्र्यसैनिक नागनाथ आण्णा नायकवडी यांनी 'रेंदाळ बँके'चा दिला जाणारा 'रेंदाळभूषण' पुरस्कार शिवसेनेच्या तत्कालीन सरपंचांच्या हस्ते घेण्यास नकार दिला. तेव्हा त्यांना खडे बोल सुनावले आणि शिवसेना म्हणजे काय आहे हेही भर सभेत सांगितले, असेही मी ऐकले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा आजही आहे. मी तीन-चार वर्षांचा असतानाच त्यांच्या इचलकरंजी च्या सभेला मला खांद्यावरून घेऊन गेलेले मला आजही आठवते. 

    माझा जन्म 16 ऑगस्ट 1992 चा आणि केवळ तीन महिन्यानंतर झालेल्या '6 डिसेंबर 1992 च्या कारसेवे'साठी हे अयोध्येत गेले होते. त्याठिकाणी झालेल्या घडामोडीचे ते साक्षीदार आहेत. त्यानंतरची आणखी एक घटना जी मी बालपणी नेहमी ऐकली ती म्हणजे रेंदाळमधील तलाठी आणि मंडल अधिकारी यांना अक्षरशः कोंडून त्यांच्याकडून करवून घेतलेले काम. तर झाले असे होते की, माझ्या पणजोबांच्या कै.श्री. महादेव राऊ पाटील या नावाचे दोन व्यक्ती रेंदाळ मध्ये होते. तलाठ्यांच्या हलगर्जीमुळे माझ्या पणजोबांच्या नावे असणाऱ्या शेतजमीनवर दुसऱ्या कै.श्री. महादेव राऊ पाटील यांच्या वारसांची  नावे लागली होती. दोन अडीच वर्षे पाठपुरावा करूनही, मागेल ती कागदपत्रे देऊनही, भ्रष्टाचाराचे पैसे चारल्याशिवाय कामच होत नाहीये हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी हे धाडसी पाऊल उचलले. कदाचित महात्मा गांधींशी आणि गांधीविचारांशी तेव्हा थोडी फारकत असावी. 

    यानंतर  'श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान' हा आणखी एक नवा प्रवास त्यांनी स्वीकारला. आदरणीय 'श्री संभाजीराव भिडे गुरुजी' यांच्या या संघटनेची ओळख श्री. विनोद पाटील (आप्पा) यांच्यामुळे झाली आणि मग त्यांनी त्या संघटनेसाठी स्वतःला वाहून घेतले. गावातून गडकोट मोहिमेसाठी तरुणांना घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेतला. अगदी 2001 साली वढू-बुद्रुक ते रायगड या मोहिमेसाठी रेंदाळ मधून 88 शिवपाईक धारकरी गेले होते. त्यांनी आतापर्यंत 23 गडकोट मोहीम केल्या आहेत. मध्यंतरी सन 2000 सालच्या दरम्यान बाबासाहेब पुरंदरे लिखित 'राजाशिवछत्रपती' ग्रंथाचे 100 रुपये प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख नोंदणी करण्याचा शिवप्रतिष्ठानने संकल्प हाती घेतला. त्यासाठी त्या काळात स्वकर्जातील 40,000 रुपये भरून चारशे ग्रंथांची नोंदणी केली. अवघ्या महाराष्ट्रात शंभरहून अधिक ग्रंथाची नोंदणी करणारे आपले रेंदाळ गाव हे पहिले होते. आजही भिडे गुरुजींना कोणीही रेंदाळ गावाहून आलोय असे कोणी सांगितले तर गुरुजी आवर्जून यांची आठवण काढतात. गावामध्ये दुर्गामाता दौड साठी अनेक तरुणांना उद्युक्त करून, त्यांना देव, देश आणि धर्मासाठी संघटित करण्याच्या चळवळीत स्वतःला वाहून घेतले. ओसामा बिन लादेन दहशतवाद्याने अमेरिकेत हल्ला केलेला तेव्हा आपल्या रेंदाळ मध्ये त्याची अंत्ययात्रा काढली होती त्यामध्येही यांचा पुढाकार होता. काय काय घोषणा दिल्या होत्या ते सहभागी झालेल्यांना अजूनही स्मरणात असतील. रेंदाळ स्टँडवर जो 'भगवा ध्वज' आजही डौलाने फडकतोय त्याची मुहूर्तमेढ रोवण्यातही यांचा सहभाग होता. मी पाचवीला असताना हायस्कूल मध्ये कपाळावर अष्टगंधाचा नाम ओढू नये असा अलिखित नियम बनवण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा पालक मेळाव्यात "अष्टगंध हे कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतीक नसून हिंदू धर्माचे प्रतीक आहे आणि तुम्हाला हिंदू धर्माबाबत आक्षेप असेल तर इथे लावलेले सर्व फोटो काढून ठेवा आणि उद्यापासून संस्थेचे नाव व प्रार्थना बदला" असे बाणेदारपणे सांगितले होते, म्हणूनच पुन्हा कधीच अष्टगंधाविरोधात 'ब्र' काढला गेला नाही. कारण संस्थेचे नाव आणि ते फोटो 'स्वामी विवेकानंद' यांचे होते आणि प्रार्थना 'हरे राम, हरे कृष्ण' अशी होती. त्याचबरोबर हायस्कूल चे मैदान रेंदाळ ग्रामपंचायत च्या नावेच राहावे यासाठी आग्रही भूमिका ठेवली, परिणामी गावातील सैन्यभरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना ते मैदान सहज आणि मोफत उपलब्ध राहिले. मध्यंतरी 'सह्याद्री युथ फोर्स'च्या वतीने रेंदाळ मध्ये नितीन बानूगडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते त्यामध्येही सहभागी होतेच. पुढे6 जून 2008 मध्ये  'शिवराज्याभिषेक समारंभा'साठी रेंदाळ मधून 50 लोक घेऊन रायगडला संभाजी राजे छत्रपती कोल्हापूर यांच्या माध्यमातून गेलेले त्यामध्ये मीही होतो.

     'स्वाभिमानी शेतकरी संघटना' नावाची चळवळ आपल्या भागात जन्माला आली. यामध्ये ही त्यांनी तितक्याच हिरीरीने आणि धडाडीने सहभाग घेतला. ऊस आंदोलनात तत्कालीन माजी खासदारांचीही गाडी अडवून धरलेली रेंदाळकरांनी पहिली होती. अगदी एक गोपनीय गोष्ट म्हणजे, आंदोलन चालू असताना एका कारखान्याला रेंदाळच्या दक्षिणेस असणाऱ्या जंगल मार्गाने चोरून ऊस वाहतूक चालू असताना, गुपचूप रात्री त्या जंगलात लपून, त्या वाहनांवर हल्ला करून, त्यांच्या चाव्या काढून आणल्या होत्या. ज्यांचा मोठा गठ्ठा आमच्या घरी खूप दिवस पडून होता. त्या नंतरच्या काळात हलाखीच्या परिस्थितीत सापडलेले असताना त्यांच्या सर्व जवळच्या मित्रांनी सहकार्य करून एक नवी दूध संस्था स्थापन करून दिली. 'जनसेवा दूध खरेदी विक्री केंद्र रेंदाळ' असे नामकरण करण्यात आले. त्यासाठी प्रामुख्याने प्रदीप बाबाजी पाटील, सुरेश दादा यादव, मोहन पाटील (मेजर), शिवाजी बापू पाटील (रामजी), प्रकाश करवते, कलगोंड लिंगाडे, सुकुमार गंथडे, दत्तात्रय पाटील (किराणा असोसिएशन), रंगराव शंकर पाटील, तानाजी बाबासो पाटील, राजू कोल्हापुरे या आणि असंख्य दूध उत्पादक यांचे खूप मोलाचे सहकार्य त्यांना लाभले. प्रदीप तात्यांच्या मातोश्रींचा जिव्हाळा मला आजही भावविवश करून जातो. 

    जनसेवेचे ब्रीद जपताना त्यांनी रेंदाळ मध्ये 'सर्वपक्षीय कृती समिती'च्या माध्यमातून 'पाण्याच्या मीटर' वरून मोठा संघर्ष उभा केला. वास्तविक त्याच कंपनीचे मीटर आणि इतर साहित्याची एकूण रक्कम सातशे वीस रुपये येत असताना ग्रामपंचायत कडून 1700 च्या आसपास रक्कम आकारली जात होती. तेव्हा ना नफा ना तोटा या तत्वाने त्यांनी कोल्हापुरातून स्वतः जाऊन असंख्य मीटर आणून ती रेंदाळकरांना उपलब्ध करून दिली. त्यानंतर रेंदाळ गावचे ग्रामपंचायतीच्या मालकीचे असणारे माने नगर भागातील 'भूखंड' काही धनदांडगे लुबाडू पाहत होते. तेव्हा ते स्वतः आणि अभिषेक पाटील, महावीर पाटील आणि राजू मुदाळकर हे चौघे उपोषणाला बसले आणि 3 दिवसांच्या उपोषणानंतर त्यांच्या लढ्याला यश आले. त्यावेळी त्यांना "गांधींच्या उपोषणातही ताकद हाय की गा..!"  हे एका मित्राला बोललेले मी ऐकले आहे. गंमत सांगायची तर 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक त्यांनीच गावात सर्वप्रथम गावभागातील जुन्या बिरदेव मंदिरात दाखवले होते. तसेच 'श्री बिरदेव  ग्राम दैवताची यात्रा' भरवली पाहिजे या हेतूने त्यांनी 'बिरदेव यात्रा कमिटी' स्थापन केली. आजही कमिटीच्या खडतर परिश्रमातून आणि बिरुदेवाच्या भक्तांच्या आशीर्वादाने यशस्वीपणे यात्रा थाटामाटात साजरी होत आहे. या सगळ्या व्यापाबरोबरच वक्तृत्व कला जोपासली जावी म्हणून 'विचारवेध व्यासपीठ' स्थापन करून रेंदाळ मध्ये दिवाळी मध्ये वक्तृत्व स्पर्धा किमान 15 वर्षे भरवली जात होती. याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून आतापर्यंत सुमारे '15 वेळा रक्तदान' सुद्धा त्यांनी केले. मध्यंतरी त्यांना 'महात्मा गांधी  तंटामुक्तीचे अध्यक्षपद' सोपवण्यात आले. तेही त्यांनी निस्पृहपणे सांभाळले. गोरगरीब लोक जेव्हा घरी आपले वाद विवाद घेऊन यायचे, तेव्हा त्यांना योग्य तो सल्ला देऊन त्याचे वाद मिटतील कसे यासाठीच प्रयत्न करताना मी पाहिले. आणखी एक चमत्कारिक वाटेल पण रेंदाळमध्ये 'अंत्ययात्रेसाठी घोंगडे'च वापरावे यासाठी जुनी जाणती मंडळी आग्रही असताना लोखंडी  पर्यायी व्यवस्था निर्माण करून खांदेकरी लोकांची होणारी अडचण थांबवण्यातही यांचा पुढाकार होता. आज ती व्यवस्थाच सर्वमान्य झाली आहे. सर्वसामान्यांना अडचणीतून सोडविण्याच्या त्यांच्या स्वभावाची आणखी एक ओळख बऱ्याच जणांना आहे, ती म्हणजे ते देत असणारे 'मुतखड्यावरील आयुर्वेदिक औषध' हे आहे. वास्तविक त्यांनाच एकदा या विकाराचा त्रास चालू झाला होता ऑपरेशन किंवा आयुर्वेदिक औषध ह्यापैकी त्यांनी आयुर्वेदिक औषधाचा पर्याय निवडला आणि त्यातून ते बरे झाले. त्यानंतर ते तेवढ्यावरच न थांबता ते औषध कोल्हापूरहून घरी आणून ज्यांना आवश्यक पडेल त्यांना अगदी मोफत देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आसपासच्या गावातूनच नव्हे तर सीमाभागातून अनेक लोक आजही औषध घेण्यास येतात. आजच्या काळात ही व्याधी अगदी किरकोळ वाटत असली तरी पंधरा वीस वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. ना वाहतुकीची साधने, ना पैशाची उपलब्धता अशी होती. सर्व सामान्य माणूस आजच्या इतकाच त्याही काळात दवाखाने आणि ऑपरेशन यांना घाबरून असायचा. त्या सर्वांना आपल्या परीने दिलासा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. '2005 च्या महापुरात' पूरग्रस्तांना मदत देण्याच्या कार्यातही ते तितकेच अग्रेसर राहिले. विविध गणेश मंडळांना आवाहन करून त्यांनी गणेश मंडळामध्ये मदत देण्यासाठी ईर्षा निर्माण केली. परिणामी पुरग्रस्तांच्या दुःखावर त्यावेळी मदतीची फुंकर घातली गेली. अलीकडेच 22 जानेवारी 2024  रोजी 'श्रीराम  मंदिरातील प्राणप्रतिष्ठा' निमित्त गावातील शोभायात्रेत पण तेवढ्याच उत्साहाने सहभागी झाले.


     या सर्व प्रवासात त्यांनी अनेक सहकारी जोडले, जिवलग मिळवले. थोरामोठ्यांबरोबर लहानांनाही आदराने वागवले. त्या सर्व गावकरी मित्रमंडळाच्या सहकार्यानेच हे सर्व कार्य कमी अधिक प्रमाणात यशस्वी करता येणे शक्य झाले.  एक ऐतिहासिक असे सावरकरांचे वाक्य ते कुणाशीतरी बोलताना मी ऐकले होते "चार काड्या गोळा करून, पिले आणि आपले  दिवसभराचे पोट भरून जगावे असा संसार तर कावळे-चिमण्यांही करतात, आपण माणूस म्हणून जगताना आपला संसार त्याहूनही वेगळा असला पाहिजे".  खरं सांगायचं तर ते तसेच जगत आहेत. तत्वासाठी प्रसंगी अनेकांचा विरोध पत्करला पण तोही दिलदारपणे, द्वेषभावना म्हणून कधीच नाही.  

     आजच्या त्यांच्या या षष्ठी पूर्ती निमित्त त्यांचा प्रवास मला तुम्हाला सांगावासा वाटला. वाढदिवस साजरे करावेत असे त्यांना कधी वाटलेही नाही आणि त्याची आवडही नाही. म्हणूनच  'जनसेवा हीच ईश्वरसेवा' हे व्रत असेच या ना त्या माध्यमातून चालू राहो ही प्रार्थना करतो आणि थांबतो.  


(मांडणी मध्ये काही कमतरता राहिली असली तर ती माझी कमतरता आहे असे समजून क्षमा करावी.)

No comments:

Post a Comment

नक्की महत्त्वाचे काय ?

  28 मे 2023 रोजी महिला कुस्तीगीर विनेश फोगट आणि साक्षी मलिक या  लैंगिक अत्याचाराचे आरोप करीत निदर्शन करीत होत्या त्यांना दिल्ली पोलीस रस्त्...