हे एक त्रिकालाबाधित सत्य आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अजिंक्य नाहीत; अमर तर त्याहून नाहीत. या दोघांना पराभूत झालेलं पाहण्यासाठी कोट्यवधी लोक देव पाण्यात घालून बसायलाही तयार आहेत. आजवरच्या राजकीय प्रवासात या जोड गोळीने अनेक छोटे मोठे पराभव पाहिले आहेत, पचवले आहेत. पण त्याचा अभ्यास करून पुन्हा आपण विजयी कसे होऊ यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले आहेत. ते असल्या कुठल्याही भ्रमात नाहीत, की आपण एका मोठ्या राजवंशाचे वंशज आहोत, ही समोरची जनता आपण जिवंत असेपर्यंत तह-हयात आपल्यावर असेच प्रेम करत राहील, मत देत राहील; आणि म्हणूनच ते 2014 च्या पूर्ण बहुमताच्या विजयानंतर स्वस्थ न बसता पश्चिम बंगालमध्ये आणि ईशान्यकडील राज्यांमध्ये आपल्या भाजपचा विस्तार पुन्हा कसा होईल यासाठी कार्यरत राहतात. 2019 च्या तीनशे तीन जागा मिळवूनही स्वस्थ न बसता 2024 साठी तमिळनाडू केरळ तेलंगणा यासारख्या दक्षिणेकडील राज्यात घोडदौड करत राहतात. हे अपार कष्ट त्यांच्या अधून मधून मिळणाऱ्या प्रचंड मोठ्या विजयाचे खरे गमक आहे.
इसवी सन 2002 साली उदयाला आलेल्या नरेंद्र मोदी या व्यक्तिमत्वाला सतत संपविण्याचा प्रयत्न करूनही ही व्यक्ती दिवसागणिक मोठी का होत जाते? याचे उत्तर त्यांना मोठे करणाऱ्या विरोधकांना सापडेनासे झाले आहे आणि म्हणून ते वैचारिक दृष्ट्या नैराश्यग्रस्त होऊन, द्वेष भावनेने अगदी निंदानालस्ती करण्यासही मागेपुढे पाहेनासे झाले आहेत. आणि मग आपण पूर्ण बळ एकवटून सुद्धा जेव्हा प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकत नाही अशावेळी त्याला त्रास देणे एवढेच त्यांच्या हाती उरते. त्याची कोंडी करणारे छोटे मोठे लढवय्ये त्यांना आपले तारणहार वाटू लागतात आणि म्हणूनच कधी कन्हैया कुमार, कधी हार्दिक पटेल, कधी विश्वंभर चौधरी, निखिल वागळे, मनोज जरांगे आणि ध्रुव राठी, "लाव रे तो व्हिडीओ" म्हणणारे राज ठाकरे यासारखे प्रत्यक्षात लढाईत नसणारे योद्धे त्यांना सेनापती वाटू लागतात आणि मग हे आपला प्रतिस्पर्धी पराभूतच होणार, हे दिवा स्वप्न पाहण्यात ते मश्गुल राहतात.
नरेंद्र मोदी 100% परिपूर्ण नाहीत हे त्यांच्या समर्थक आणि चाहत्यांनाही माहिती आहे. त्यांनी आमच्या घरावरती सोन्याची कौले चढवावीत, आम्हाला फक्त बसून खायला मिळाले पाहिजे, असे कोणाचेही म्हणणे नाही. आम्ही स्व-कष्टाने जे काही मिळवतो, कमावतो त्यातील थोडा बहुत हिस्सा कर म्हणून सरकारला द्यावाच लागतो, याची प्रत्येकाला कल्पना आहे. फक्त द्यावा लागलेला हिस्सा प्रामाणिकपणे कारणी लागला जावा, एवढीच माफक अपेक्षा असते. आमच्या कष्टातील रक्कम कर म्हणून घ्यावी आणि त्याचा भ्रष्टाचार करून चैन करावी, असे चित्र जनतेला ज्या क्षणी दिसेल; त्या क्षणी ही जनता अगदी कोणीही असला तरी सिंहासनावरून खाली घेतल्याशिवाय राहत नाही. राजा इतिहास घडवत नसतो, तर जनता इतिहास घडवत असते आणि जनताच त्यांच्यावरती राज्य करणारे राज्यकर्ते निर्माण करत असते.
आणीबाणीच्या कालखंडामध्ये केलेल्या हुकूमशाही वर्तनाची शिक्षा म्हणून जनतेने स्वतः इंदिरा गांधीनाही पराभूत केले, पण त्यानंतर सत्तेवर आलेल्या 'जनता आघाडी'ला संपूर्ण पाच वर्ष सरकार टिकवता आले नाही. म्हणून त्याच जनतेने पुन्हा संपूर्ण देशाची सूत्रे हुकुमशहा म्हणवल्या गेलेल्या इंदिरा गांधींच्याच हाती बहुमताने सुपूर्द केली. इंदिरा गांधींनी त्यावेळी केलेली घोषणा काय होती माहिती आहे? "चलने वाली सरकार". आज नरेंद्र मोदी दुसरे काय सांगत आहेत ? "भारताच्या विकासासाठी मजबूत सरकार", मग जनता का म्हणून यांना मत टाकणार नाही? आज विरोधातील एकतरी पक्ष बहुमताचे नाव तरी काढत आहे का ?
'मोदींना पूर्ण शंभर टक्के जनतेचा पाठिंबा आहे', असे मी तरी म्हणणार नाही. अहो, पण मोदीच कशाला? तुम्ही सांगा; गांधी, नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी यांना तर कुठे 100% जनतेचा पाठिंबा होता? मुळात 100% बहुमत अशी काही संकल्पनाच लोकशाहीत नसते. 51% मते मिळवले तर त्याला शंभर टक्के सत्ता प्राप्त होते आणि 49% मिळवून सुद्धा तो सत्तेपासून वंचित राहतो. आणि मग यामध्ये बहुमताला महत्त्व प्राप्त होते. आणि ते आज नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भाजपच्या बाजूला आणून उभे केले आहे, हे सत्य तुम्ही स्वीकारले तर होणाऱ्या वेदना थोड्या कमी होतील.
'फक्त 37.36% लोक भाजपला मत टाकतात' असे जेव्हा विरोधक बोलतात, तेव्हा हेही त्यांनी सांगितले पाहिजे की, त्यापेक्षा कमी 19.49% लोक हे काँग्रेसला मतदान करतात. सुमारे 23 कोटी मतदार भाजपच्या बाजूचे असतील, तर बारा कोटी लोक हे काँग्रेसच्या बाजूचे आहेत. हे बारा कोटी लोक असंतुष्ट असतील, तर या बारा कोटी लोकांचा आवाज हा मोठा असणारच, पण म्हणून त्याचा परिणाम त्या 23 कोटी मतदारांवरती होईलच असे नाही ना? कारण 'काँग्रेसचे धोरण हे देशहितासाठी, समाज हितासाठी आहे' हे त्या 23 कोटी मतदारांना पटविण्यात काँग्रेस अपयशी ठरते आहे.
जनता निवड करत असताना नेहमी प्रमाणबद्धता या पद्धतीचा वापर करत असते. तिला ना नरेंद्र मोदी 100% बरोबर वाटतात, ना शंभर टक्के राहुल गांधी चुकीचे; पण ज्या प्रमाणात नरेंद्र मोदी बरोबर वाटताहेत तिथपर्यंत राहुल गांधी पोहोचतच नाहीयेत. आणि म्हणून जनता नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून देत आली आहे. 'अमुकपेक्षा तमुक बरा' एवढाच विचार निवडून देत असताना जनतेच्या मनामध्ये असतो. म्हणूनच तर तुम्ही सर्वसामान्य जनतेला विचारले तर "हे सगळे राजकारणी सारखेच आहेत" असे उत्तर देते. या जनतेला आपल्या बाजूला वळविण्यासाठी तुम्ही पुन्हा पुन्हा मोदींच्या अपयशावर बोट ठेवत राहणार आणि मोदींचे समर्थक त्यांच्या कर्तृत्वाचे ढोल वाजवत राहणार. त्यांचे अपयश जोपर्यंत कर्तृत्वापेक्षा मोठे होत नाही, तोपर्यंत तुम्ही मोदीजींबद्दल जनतेच्या मनात नाराजी निर्माण करू शकत नाही. या सर्वांमध्ये मोदींचे अपयश झाकोळले जात आहे का? तर अजिबात नाही. जनता स्पष्टपणे सांगत आहे "बेरोजगारी ही देशासमोरची मोठी समस्या आहे", पण या बेरोजगारीला दूर कोण करू शकतो? हे जनता ठरवत असताना मोदी हे राहुल गांधींपेक्षा आश्वासक वाटतात. आज आपल्या शेजारी राष्ट्रांची काय अवस्था आहे? आणि आपली काय आहे? याचीही तुलना ती जनता करत असते. स्वयंरोजगाराच्या ज्या नवनवीन संधी 2014 पासून 2024 पर्यंत निर्माण झाल्या त्या डोळेझाक करून चालणार नाही. 2014 पर्यंत छोट्या-मोठ्या चायनीज वस्तू पाहून ज्यांना वेदना होत होत्या, त्या कुठच्या कुठे पळून गेल्या आहेत. संसार उपयोगी प्रत्येक वस्तू वरती आता मेक इन इंडिया चा सिंहाचा लोगो त्यांना अभिमानाची जाणीव करून देत असतो. मोबाईल आयात करणारा आपला देश, आता तो निर्यात करू लागला आहे हे समजताच त्याला आनंद होऊ लागतो. राज्य आणि राज्यव्यवस्था चालवताना कोणता तरी निर्णय घेणे आवश्यक असते आणि तो वेळेवर घेणे हे त्याहून अधिक आवश्यक असते. ए. के. अँटोनी सारख्या देशाच्या संरक्षण मंत्र्याने भर लोकसभेत "चीनच्या सीमेजवळ विकास न करणे हेच आमचे धोरण आहे" असे आत्मघातकी विधान उच्चारलेले जेव्हा देशाचा विचार करणाऱ्या सर्व सामान्य व्यक्तीच्या कानावरती येते, तेव्हा ती व्यक्ती आपसूक तुमची विरोधक बनून जाते.
पुढचा मुद्दा आहे महागाईचा. तर होय काही गोष्टी म्हणण्यापेक्षा सर्वच गोष्टी महाग झालेल्या आहेत; अगदी राहुल गांधींचे आश्वासन सुद्धा 72 हजारावरून एक लाखावर येऊन पोहोचले आहे. मग जनतेला हे दिसतेच की गेल्या पंचवार्षिक ला 72 हजार रुपये देणारा माणूस, आज एक लाख रुपये द्यायला का तयार होतोय? तर पाच वर्षांपूर्वी ज्या मतदाराची किंमत 72 हजार ठरवली गेली, त्याची किंमत आज एक लाख झाली आहे, हे तुम्हीच मान्य करताय. मग बाकीच्या वस्तू तुम्हाला 2019 च्या दरात कशा काय बरे पाहिजे आहेत? जनतेला हे कळत नाही का? की जगामध्ये दोन राष्ट्रांमध्ये युद्ध चालू आहे. 2019 मध्ये जगभरात कोरोना सारखी महामारी पसरली होती. कोरोना नंतरच्या जगात आपल्या शेजारची श्रीलंका, पाकिस्तान, भूतान, नेपाळ यासारखी राष्ट्रे आर्थिक दृष्ट्या मेटाकुटीला आली. असे असताना सुद्धा भारतात मात्र 80 कोटी लोकांना मोफत धान्य पुरविले गेले. त्या जनतेला हे माहीत नाही का? मनमोहन सिंग सरकारच्या कालखंडामध्ये धान्य पावसात भिजवले गेले, अक्षरशः कुजले; पण लोकांना वाटले गेले नाही, अगदी सुप्रीम कोर्टाने सांगून सुद्धा. मग इथे प्रश्न निर्माण होतो तुमच्या धोरणांचा आणि मग तुमची धोरणे ही जनतेला आवडेनाशी होतात. मतदान हे आवडीनुसार पडणारी गोष्ट आहे मग जनतेला आवडणाऱ्या गोष्टी करणाऱ्या नेत्याला जनता तितकीच भरभरून मते देते.
आम्ही कशाही प्रकारच्या मार्गांचा अवलंब करू आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे मात्र, राजा हरिश्चंद्र, प्रभू रामचंद्र आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रमाणे न्याय आणि नीतीला धरूनच राजकारण करतील. ही अपेक्षाच मुळात चुकीची आहे. "आम्ही प्रामाणिक वागू आणि आमच्या प्रामाणिकपणावरती भाळून आम्हाला मते पडतील आणि आम्ही सत्तेत येऊ" अशी भोळीभाबडी समजूत नाही त्यांची. तुम्ही आजवर ज्या काही कोलांटउड्या मारल्या आहेत. जी काही हीनातली हीन पातळी गाठून सत्तेसाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले आहे. त्या सर्वांचा हिसाब किताब पूर्ण करण्यासाठीच आम्ही त्याच पातळीवरती जाऊन राजकारण करायला मागे पुढे पाहणार नाही अशीच ग्वाही त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणातून दिली आहे. 2019 मध्ये भाजप आणि शिवसेना या युतीला पूर्ण बहुमता इतक्या जागा मिळून सुद्धा ज्यावेळी भाजपाला सोडून उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले आणि त्यांच्या या सत्ता स्थापनेमुळे ज्यांना ज्यांना म्हणून आनंदाच्या उकळ्या फुटल्या, गुदगुल्या झाल्या. त्या सर्वांना धडा शिकवण्यासाठी आणि त्यांच्या गुदगुल्यांना वेदनेत रूपांतरित करण्यासाठीच शिवसेना आणि राष्ट्रवादी यासारखे मातब्बर असणारे दोन पक्ष उभे फोडले गेले. तसे नसते तर एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांनी भाजपामध्ये सहभागी होऊन सत्ता स्थापन करून आरामात सुखाने राहण्याचा मार्ग चोखाळला असता.
370 कलम हटवल्यानंतर निर्माण झालेली श्रीनगरच्या लाल चौकातील शांतता ज्यांना दिसत नाही, देशभरात पसरले गेलेले महामार्गांचे जाळे ज्यांना दिसत नाही, भादलासारखा सौर ऊर्जेपासून वीजनिर्मिती करणारा जगातील सर्वात मोठा प्रकल्प ज्यांना दिसत नाही, भारतामध्ये वाढलेले ऑनलाईन UPI ट्रांजेक्शन ज्यांना दिसत नाही, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचलेली अर्थव्यवस्था ज्यांना दिसत नाही, 140 कोटी लोकांना मोफत पुरवली गेलेली विक्रमी वेळेतील कोरोना लस ज्यांना दिसत नाही, एका देशाचा प्रधानमंत्री आपल्या देशाच्या प्रधानमंत्रीच्या पायाशी झुकतो हे ज्यांना दिसत नाही, भारताच्या सीमावर्ती भागात सैन्यासाठी उभारले गेलेले मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर ज्यांना दिसत नाही, शत्रू देशाच्या नाकावर टिच्चून केवळ दोन दिवसांमध्ये आणला गेलेला अभिनंदन वर्धमान ज्यांना दिसत नाही, गेल्या दहा वर्षात वीज पुरवठ्याबाबत सुधारलेली परिस्थिती ज्यांना दिसत नाही, श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर कोट्यवधी हिंदूंच्या दुखऱ्या वेदनेवरती घातलेली फुंकर ज्यांना दिसत नाही, अशा सगळ्या झोपेचं सोंग घेणाऱ्या मनोरुग्णांची मोदी शाह फिकीर करतीलच कशाला?
सुहास पाटील
रेंदाळ

No comments:
Post a Comment