आपली एका दिवसातील चार किल्ल्यांची भ्रमंती संपवून मी श्री हडसरच्या पायथ्याशी पेठेची वाडी या ठिकाणी आलो. विचारपूस करून हनुमान मंदिरात आपले साहित्य ठेवले. जवळच असणाऱ्या हातपंपावर हातपाय धुवून आल्यावर थोडी हुशारी आली. मग परत आल्यावर पाहतो तर एक मावशी शेकोटी करून बसलेल्या. "काय काय मावशी छान चाललीय की शेकोटी" असे म्हणताच त्यांनी आपुलकीने बोलावले आणि बस म्हटले. मग काय शेकोटी जवळ बसून चालू झाल्या गप्पा. इथला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कसा असतो? इथपासून सणवार, यात्रा, शेती, पिके इथेपर्यंत आमची चर्चा रंगली. हे सर्व चालू असताना आणखी एक आजीबाई आम्हाला साथ द्यायला आल्या मी त्यांना विचारलं "हे असे सर्व रोज शेकोटी करून बसतात का?" तर त्या आजी म्हणाल्या " रानामध्ये कामे नाहीत आता आणि हे आपले रोज 'टाईमपाच' म्हणून चालू असतंय. त्यांच्या टाईमपाच शब्दाने असे काही हसू आले की मी त्या आजींना टाईमपाच आजी असेच लक्षात ठेवायचे ठरविले. मध्येच उठून मावशी आत गेल्या आणि कपभर चहा घेऊन आल्या, गेल्या चोवीस तासात गरम गरम आणि ताजे असे काही मिळत होते. ते पीत असताना
मावशी : "हे बघ आता तुझे साहित्य इथे आण , जेव आणि इथेच झोपी जा...मंदिरात लाईट नाही काय नाही आणि एकटाच कुठे राहतोस तिथे ?"
मी : "नको ओ मावशी ,कशाला हे सर्व ?"
मावशी : बाळा ,काळ-वेळ सगळ्यांना असते. एकटाच आलाईस, माझा मुलगा असता तर केले नसते का मी?
मी ठीक आहे या पलीकडे काहीच बोलू शकत नव्हतो. मी साहित्य घेऊन आलो. टाईमपाच आजीही चपाती भाजी घेऊन आल्या आणि आम्ही तिघे जेवायला बसलो. मी पुरे म्हटले तरी मावशी माझा एकही शब्द न ऐकता मला वाढत होत्या. म्हणायच्या "एवढे चार गड करून आलाईस. उद्या आणि परत करणार खाऊन घे. आणि उद्या सकाळी उठ, चहा घे, गडावर जाऊन ये, अंघोळ आवर, सकाळी जेव आणि मगच जा" माझ्या सारख्या गडभक्ताला आईची माया आणि ते अपार साधे प्रेम पाहून गहिवरून येत होते. जेवण आवरून पुन्हा शेकोटीची उब मिळवून मग गादी, उशी, रग, वाकळ अशा जय्यत तयारीनिशी माझ्या विश्रांतीची व्यवस्था केली गेली. मी मात्र त्यांच्या आदरआतिथ्याने क्षणाक्षणाला भारावून निःशब्द होत होतो.
सकाळी पावणेसहाला उठून सर्व आवरून, गरम चहा घेतला आणि गड चढाईला सुरू केले.पायवाटेने गडाला भिडत वर वर जात राहिलो. कालच्या ताज्या आहाराने,सकाळच्या गरम गरम चहाने आणि थंड वातावरणामुळे हुरूप आलेला, आणि माझी अखंड गडचढाई सुरू होती. अगदी वीस मिनिटात कातळ कोरीव मार्गाजवळ येऊन पोहोचलो. त्यांना पार करताच गुडघ्याएवढ्या उंचीच्या बांधीव पायऱ्यांचा मार्ग लागला. मनोमन महाराजांचे नाव घेतले आणि त्यांनाही पाहतापाहता पार केले आणि समोर आला अखंड दगडात कोरलेला श्री हडसरचा दरवाजा. सैनिकांसाठीच्या देवड्या, पायऱ्या, बुरूजाचा गोलाकार हे सर्व दगडातच कोरलेले पाहताना त्या काळातील ऐतिहासिक वातावरणाला अनुभवत होतो.
वज्राहून कठीण अशा सह्याद्रीच्या काळ्या कभिन्न दगडाला फोडून असे दुर्गशिल्प उभे करताना किती वीर राबले असतील, अशा सजलेल्या मार्गाला पाहून शिवरायांचा उर कसा भरून आला असेल, अशा भावनांचा कल्लोळ माझ्या मनात उठत होता. तो अनुभवतच गडावरील प्राचीन महादेव मंदिरात गेलो. तिथल्या गरूड, हनुमंत, गणपती यांच्या मूर्तींना नमस्कार केला आणि गडावरील कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंधार कोठड्या पहायला गेलो. गडाच्या पश्चिमेस मंदिराच्या मागे कड्यालगत छोटा मार्ग कोरून तीन गुफा कोरल्या असून दोन गुफांमध्ये प्रत्येकी तीन छोटे दरवाजे असून खोल जमिनीत 30फूट×30फूट× 30फूट अशी भयान वाटतील अशी कोठारे खोदलेली असून इतिहास काळात त्यांचा वापर कैंद्यांना अंधार कोठडीची शिक्षा देण्यासाठी करत असत. कितीही मोठा प्रकाश टाकला तरी अंधारच डोळ्यात घुसावा आणि आपल्याला आपल्या डोळ्यांचाच संशय यावा अशा कैद्यांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या कोठड्या पाहिल्या. तिथून मग पूर्वेला असणाऱ्या कड्याच्या वाटेकडे गेलो. तिथे उभ्या कड्यामध्ये लोखंडी गज मारून त्यावरून साहसी दुर्गवेडे गडचढाई करतात. तिथेच असणाऱ्या मारूतीरायाचे दर्शन घेऊन मी गडउतार व्हायला सुरूवात केली. थोड्याच वेळात त्या मावशींच्या घरी येऊन सर्व साहित्य आवरले. तोवर मावशींनी नको नको म्हणतानाही खास माझ्यासाठी केलेली चपाती भाजींची शिदोरी मला बांधून दिली आणि "शिस्तीत जा बाळा, परत कधी आलास तर आठवण ठेव मावशीची" असे म्हणताच मी गहिवरून गेलो आणि त्यांना नमस्कार केला.
आता लक्ष्य किल्ले निमगिरी आणि हणुमंतगड या जोडकिल्यांचे होते. अर्ध्या तासातच मी पायथ्याच्या खंड्याचीवाडी या गावी पोहोचलो. साहित्य गावीच ठेवून शेतीच्या बांधावरून गडाला जवळ करू लागलो. वाटेतच एक शेतकरी बांधव भेटला त्याने जवळच असणाऱ्या चाळीस वीरगळींची आणि गडवाटेची माहिती दिली. मग काय लगोलग तो जंगलात आडवाटेवर असणाऱ्या अज्ञात वीरांच्या स्मारकांना भेट द्यायला जंगलात शिरलो. कधीकाळी घनदाट अरण्यात दिलेल्या कडव्या झुंजीनंतर पत्करलेल्या वीर मरणाची साक्ष देत या चाळीस वीरगळी या अरण्यात आहेत. त्यानंतर मग गड चढाईला सुरूवात केली. जंगलातील वर चढत जाणारी वाट आणि माझ्या नकळत गडचढाईवर लक्ष देणारा शेतकरी बांधव असे काहीसे चित्र होते; आणि मी थोडी वाट चुकताच आरोळी देऊन मला योग्य दिशेने जाण्यासाठी सांगितल्यावर लक्षात आले की माझ्या एकट्याच्या गडचढाईच्या काळजी पोटी तो शेतकरी दादा अर्धा तास उन्हात उभा होता. हे प्रेम आणि जिव्हाळा सह्याद्रीनेच त्यांना शिकवला असावा. तिथून थोडे उजवीकडे गेल्यावर अर्धवट खोदलेली एक गुहा पहायला मिळते. तिथून मग वर जात कातळ कोरीव पायऱ्या आणि काही पाण्याची टाकी, गजलक्ष्मीचे शिल्प असणारे मंदिर पाहिले. तिथून पुढील चढाईचा किल्ले श्री सिंदोळा आकाशात झेपावलेला दिसत होता. हे पाहून मी गड उतार होऊ लागलो. समोरच हणुमंतगडाची तटबंदी आणी बुरूज स्पष्ट दिसत होते ते पाहून मी गडउतार झालो आणि शेतकरी बांधवाला मनापासून धन्यवाद देऊन गावात आलो. तिथे माझे असणारे साहित्य पाठीवर घेतले आणि निघालो पुढील एका थरारक अनुभव देणाऱ्या किल्ले श्री सिंदोळ्याकडे...
(क्रमशः)



































No comments:
Post a Comment