'सह्याद्रीचे वारे' वाचून आणि पाहून माझा एक मित्र माझ्यावर रागावला. म्हणाला मलाही पाहायचे आहेत गड किल्ले आणि तुला माहिती असूनही मला न सांगताच एकटा गेलास. मी म्हटलं आता पुण्याहून कोल्हापूरला जाताना वाटेत पाच गड आहेत ते पाहात जाणार आहे तर तू येऊ शकतोस.असे म्हणताच तो उत्साहाने आदल्या रात्री आला आणि मी सकाळी सकाळी त्याला घेऊन आपल्या दुर्गवारीसाठी कूच केली.नियोजन होते श्री चंदन-वंदन ,श्री नांदगिरी ,श्री वर्धनगड,आणि श्री महिमानगड. आणि नुकतेच माझे जीवलग बनलेले श्री सुनिल निकम (रा.रहिमतपूर) माझ्या येण्याची आणि भेटीची वाट पाहत होते.माझ्या मार्गाबाबत सर्व सूचना आणि काळजी त्यांनीच घेतली होती. साडेनऊला किकली या गावातील प्राचीन भैरवनाथ मंदिर पाहिले.अतिशय सुंदर असे कोरीवकाम आणि आवारामध्ये श्री .संकेत बाबर यांनी गावातील शोधून एकत्रित केलेल्या सुमारे बावन्नहून अधिक वीरगळी अभ्यासपूर्वक पाहिल्या. इतिहास अभ्यासकांनी आवर्जून पाहाव्यात या वीरगळी. तिथून लगेचच बेलमाची या पायथ्याच्या गावी पोहोचून महादेव मंदिरात साहित्य ठेवून आम्ही गड चढाईला सुरूवात केली .थोडे अंतर चढून जाताच माझ्या मित्राचा वर येण्यासाठीचा उत्साह मावळला आणि तो मटकन खालीच बसला.काही अंतर आणखी चालल्यावर मात्र तो म्हणाला "तुझे तू जाऊन ये बाबा...! ! मी बसतो इथेच " मी आणखी विनवणी केली तरीही म्हणाला..."मला सपाट जमिनीवरील काय दाखवायचे असेल तेवढे दाखव बास बाबा" खरे तर मित्राला पहिल्यांदाच गड चढाई म्हणजे काय हे समजून चुकले होते .मीही जास्त वेळ न लावता त्याला विश्रांती घे म्हटलं आणि गडावर गेलो.दहाच मिनिटांत दोन गडांच्या मध्ये असणाऱ्या भैरवखिंडीत पोहोचलो आणि श्री चंदन-वंदन च्या अप्रतिम अशा दर्शनाने तृप्त होऊन गेलो.डावीकडे श्री चंदनगडाचा कडा मनाला ओढ लावत होता तर उजवीकडे श्री वंदनची उंची काळजात घर करत होती.पहिल्यांदा चंदनगडाला पाहायचे ठरवून मी कड्यालगतच्या पायवाटेने अक्षरशः धावत सुटलो...पूर्ण गडाला वळसा घालून गडाच्या पुर्वेला जायचे होते.थोड्या वेळात गडाच्या फरसबंदी मार्गाला पोहोचलो.गडाच्या थोड्या पायऱ्या चढताच मुख्य वाटेला दुभंगणारी रणमंडळ रचना चंदनगडावर आढळते.आपण ती अभ्यासली पाहिजे.पुढे जाताच गडाच्या दरवाजाचे अवशेष पाहता येतात.महादेव मंदिर ,एकावर एक ठेवलेले महाकाय दगड ,एक विहीर,ऐतिहासिक वाड्याचा चौथरा आणि झुडूपांनी ताब्यात घेतलेली एक ऐतिहासिक वास्तू पाहून गडउतार झालो.आता लक्ष्य होते श्री वंदनचे.
भैरवखिंडीतून थोड्या वेळातच श्रीवंदनच्या महादरवाजात पोहोचलो आणि झरझर तो साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहू लागला.पहिला दरवाजा पार करून दुसऱ्या दरवाजात पोहोचताच ते बांधकाम त्या ओवऱ्या पाहून अंगावरती रोमांच उभे राहू लागले अभिमानाने मान ताठ झाली.नकळत हात जोडले गेले. याच त्या किल्ले श्रीवंदनच्या भिंती आहेत ज्यांनी पाहिले माझ्या राजाला .10 नोव्हेंबर 1659 ला प्रतापगडावर अफजलखान नावाचा बलाढ्य शत्रू फाडून त्याच्या सैन्याची दाणादाण उडवली आणि विजयाचे ढोल वाजवत न बसता महाराज नेतोजीला आदेश देता झाले "चंदन-वंदन धरोनी पन्हाळा पावेतो विश्रांती नाही " आणि मग आक्रमणाच्या गगनभेदी तुताऱ्या वाजवल्या गेल्या ,शिंगे ,कर्णे ,नगारे यांच्या आवाजांनी शत्रूच्या कानठळ्या बसू लागल्या ,जावळीच्या अरण्यात आदिलशाही फौजांच्या रक्तात न्हालेल्या समशेरी तशाच शत्रूची लांडगेतोड करत श्रीवंदनच्या दिशेने धावत सुटल्या.मावळे....मावळे नव्हते ते अवघ्या मुलुखाचा घास घेत सुटलेली कालभैरवांची सेना होती ती.महाराजांच्या आदेशाने पेटून उठलेली ही सेना काय आरोळ्या देत सुटली असेल..हर हर महादेव ,हाणा,मारा,तोडा,झोडा,फोडा..त्या आरोळ्या माझ्या कानात घुमू लागल्या होत्या आणि मी रोमांचित होत होतो.... आणि ही अशी सेना घेऊन राजे 11 नोव्हेंबर 1659 ला श्रीवंदनच्या दरवाजातून गडावर पोहोचते झाले. याच भिंतींनी पाहिली अवघ्या 29 वर्षाच्या शिवरायांची धमक,त्यांच्या छातीतील उर्मी आणि अवघा सह्याद्री काबीज करण्याची इच्छा बाळगणारी नजर.तीच नजर इथल्या भिंतीवर भिरभिरत फिरली होती .हे सर्व डोळ्यांपुढे उभे राहताच ....रक्ताचा कण न् कण पेटून उठू लागला.पाठीचा कणा नकळत ताठ होऊ लागला . महाराष्ट्राच्या नव्हे नव्हे देशाच्या इतिसाला कलाटणी देणारी ती घटना होती आणि त्या अफजलवधानंतर महाराज असे काही आदिलशाही मुलुखात घुसले की त्यांच्या या रूद्रावताराने आणि मांवळ्यांच्या प्रलयंकारी तांडवाने शत्रूला पळताभुई थोडी झाली. आणि महाराजांनी अवघ्या अठरा दिवसात पन्हाळ्याचा घास घेतला. पन्हाळ्याच्या दर्शनाची माझ्या राजाला ओढ किती असावी हो...? ? महाराजांनी अवघा पन्हाळा मशालींच्या उजेडात भर रात्री पाहिला.
29 वर्षाच्या महाराजांच्या या महापराक्रमाला स्वतःच्या काळजात जपून ठेवणाऱ्या त्या श्रीवंदनच्या ओवऱ्यांना डोळ्यांत साठवून किल्ल्याच्या पुढील वाटचालीस सुरूवात केली.श्रीवंदनच्या मुख्य मार्गावर झाडे,झुडपे खूप वाढल्यामुळे आपली वाटचाल तटावरून होते.खरेतर शिवरायांच्या अधीर पावलांनी पावन झालेल्या या मार्गाचा श्वास आपण मावळ्यांनी करायलाच हवा.आणि आम्ही तो करूच. पुढे चुना मळणीचा घाणा असून त्याच्या पुढे आणखी एक फारसी शिलालेख असणारा छोटा दरवाजा असून त्यानंतर आपण गडावर पोहोचतो.गडावर इतिहास कालीन इमारतींचे खूप सारे अवशेष असूनही ते झाडीमध्ये गडप होण्याच्या मार्गावर आहेत.आणखी एक चहूबाजूंनी बंदिस्त अशी चारकप्पी इमारत होती ते पाहून पुढील महादेव मंदिर पाहिले.गडावर सर्वोच्च ठिकाणी भगवा डौलाने फडकत होता दोन पाण्याचे तलाव होते.काही तटबंदीचे अवशेष शिल्लक आहेत.दक्षिण दिशेला चोर दरवाजा आहे.आणि आरमारप्रमुख तुळाजी आंग्रे यांची समाधी आहे. हे सर्व डोळ्यांत साठवून गदगदलेल्या भावनेने मी श्रीवंदनच्या मातीला नमस्कार केला. माझ्या महाराजांच्या स्मृतीला असेच जपून ठेव असे मागणे मागितले आणि निरोप घेतला.
पायथ्याशी मित्र एकटाच असल्याने लगोलग धावत सुटलो आणि अगदी वीस मिनिटांत पायथ्याशी पोहोचलो. सर्व साहित्याची जमवाजमव करून निघालो अनोखे दुर्गधन जपणाऱ्या किल्ले श्री नांदगिरीच्या दिशेने..
(क्रमशः)






































No comments:
Post a Comment