Sunday, December 22, 2019

सह्याद्रीचे वारे भाग -पाच



सह्याद्रीचे वारे  भाग पाच



( अखेरचा )



       किल्ले निमगिरीवरूनच आपल्या वेगळ्या ठेवणीने आणि आकाशाला भिडलेल्या उंचीने माझे लक्ष खिळवून ठेवणाऱ्या किल्ले श्री सिंदोळा याला भेटायला मी निघालो. निमगिरीच्या खिंडीतून उतरणाऱ्या वळणा-वळणाच्या  रस्त्याने बड्याचीवाडी हे गड पायथ्याशी असणारे गाव गाठले. गडावर जाणाऱ्या वाटेची विचारपूस केली, साहित्य ठेवले आणि आठवणीने पिण्याचे पाणी भरून घेतले कारण गड उतरून पुन्हा येईपर्यंत पाणी नाही हे माहिती होते.
            स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे मी गडाकडे जाणारी पायवाट धरली पण गडाच्या पायथ्याशी असणारे घनदाट जंगल, माजलेले गवत यामध्ये मधेच ती वाट गायब होत होती मग आपल्या नजरेला दुसरी पायवाट सापडेपर्यंत तशीच गवतातून गडचढाई सुरू ठेवायची असा माझा क्रम चालू झाला. जेव्हा मुख्य गडाचा डोंगर लागला तेव्हा माझी खरी कसोटी लागली. वाट सापडत नसल्याने पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेल्या नाळेतून मी गड चढायला सुरूवात केली. ते भले मोठ्ठे दगड आणि मी भर जंगलात गडचढाई करणारा. वाट कोणती माहिती नाही, दरवाजा कोणत्या दिशेला आहे? माहिती नाही, गडावर कोणी येतात की नाही? हेही मला माहिती नव्हते. मध्येच एका गायी चारणाऱ्या बांधवाचा आवाज आला... मी जोराने हाळी देऊन विचारले "मामाsss गडावर जायला वाट कुठे आहे?"  त्यांनी इतकेच सांगितले "वरsss चढ वरss" हा गुरूपदेश मनाशी पक्का करून मी फक्त गडाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. वाटेत मध्येच एक धान्याचे खळे दिसले. धान्य मळण्याची ही जुनी पद्धत आहे.तिथून हा श्री सिंदोळा काय अप्रतिम दिसत होता सांगू नाही शकत. ते दृश्य डोळ्यांत साठविले आणि वाटचाल सुरू ठेवली. खूप प्रयत्न करूनही गड चढाईची गती काही वाढत नव्हती. वर तळपणारे सूर्यदेव उन्हाची सावली धरून होते. अधूनमधून गवतातून चालताना कुसळराव सदैव आक्रमण करीत होते. माणसाला शरीरात घुसून रूतून बसणाऱ्या बाणांची कल्पना बहुतेक या हट्टी कुसळरावांनीच सुचवली असावी बहुतेक. गडाचा कातळकडा अजूनही दूर होता आणि माझी पाऊलवाट एका तीस फूट उंचीच्या उंचवट्यासमोर येऊन संपली. मातीवर आलेले ते खुरटे गवत धरूनही मी वर जाऊ शकत नव्हतो आणी काठी अथवा पायातील बूट यापैकी काहीच उपयोगास येत नव्हते मग? दोन्ही हातांच्या बोटांचा वापर करायचं ठरवून तो उंचवटा पार करायला सुरू केले. मांजर जसे आपल्या नख्या रूतवते त्याप्रमाणे मी आपल्या हातांचा वापर करू लागलो. मध्ये एक दोनदा पाय घसरलेसुद्धा... चुकून तोल गेलाच तर दीड-दोनशे फूट घसरत जाणे इतकेच हाती होते. सर्व भार सह्याद्रीवर टाकून मनोमन मारूतीरायाचे स्मरण करून नेटाने तो उंचवटा पार करत होतो. आणि शेवटी अर्ध्या तासाच्या लढाई नंतर तो सर झाला. अक्षरशः दोन मिनिट थांबून मी मागील वाट शोधत होतो वाट तर कुठे दिसतच नव्हती. दिसत होता फक्त उतार दोन अडीचशे फुटांचा. मनात एकच विचार होता, ही नव्हे ती दुसरी वाट असावी.... दुसरी वाट असेल तरच बरे नाहीतर सुहास तुझे काही खरे नाही.... आणि सुदैवाने थोडे अंतर पार करताच उजवीकडून आलेली मळलेली पायवाट सापडली आणी हुशsss झाले. मग माझी गती वाढली. गडाची सावली लागताच तिथेच एका पायरीवर बसून मावशींनी दिलेली शिदोरी सोडली.
           त्यानंतर थोड्या चढाईने मी गडाच्या दरवाजात आलो. तिथली तटबंदी ढासळलेली असून त्यावर  वाढलेल्या झुडूपांमुळे ओळखून येत नाही. तिथे कातळात कोरलेली एक गणपतीची मूर्ती पाहून पुढे चालू लागलो. गडमाथ्यावरील गडाचे जे काही अवशेष असतील ते छातीएवढ्या वनस्पतींच्या ताब्यात गेले असल्यामुळे पाण्याची टाकी आणि तटबंदीचे थोडे बहूत अवशेष एवढेच नजरेस पडते. गडाच्या सर्वोच्च ठिकाणी गेल्यावर मात्र एकमेकांशी स्पर्धा करणारी सह्याद्रीची गिरीशिखरे आपल्या नजरेस येतात. समोरचा महाकाय हरिश्चंद्र गड आपल्या नजरेच्या टप्प्यात येतो. आपल्या सौंदर्याची मोहिनी घालणारा माळशेज घाट आकाशात भरारी मारणाऱ्या पक्षांना कसा दिसत असेल याचा अनुभव सिंदोळ्याच्या पश्चिम टोकाला गेल्यावर येतो. समोरच्या पिंपळगाव जोग धरणाचे पाणी लुकलुकताना पाहणे हा एक सुखद अनुभव होता. तसेच पुर्वेला असणारा हटकेश्वर महादेवाचा डोंगर हट्ट करून फुगून टुम्म होऊन बसल्यासारखा दिसत होता. हा सर्व निसर्ग डोळ्यांत आणि मनात साठवत गडउतार होण्यासाठी सुरूवात केली. उतरताना मात्र एकमेव असणारी पायवाट सोडली नाही. त्या पायवाटेने मला गडाला डाव्या हाताला ठेवून पूर्वेकडील उतार असणाऱ्या बाजूला नेले. त्या उताराने उतरताना माझ्या मनात विचारांचे वादळ उठत होते. माझे मलाच आश्चर्य वाटत होते दोन दिवसात सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर असणारे एकाहून एक असे मातब्बर गड सर करत होतो आणि भूक नावाची गोष्ट माझ्या गावीही नव्हती... कसे काय बरे ? माझे मलाच कोडे पडले होते आणि मग आठवले  एका पहाडी आवाजाच्या शाहिराचे बोल. शाहीर पिराजीराव सरनाईक यांचे ते शब्द त्यांच्या कडाडणाऱ्या डफासोबत कानात घुमू लागले.

 सह्याद्रीचे पिऊनी वारे कृष्णेचे पाणी
वीर मराठे स्वातंत्र्याची गाती जय गाणी

अशा भारलेल्या भावना घेऊनच आजूबाजूला पसरलेल्या सह्याद्रीला नमस्कार केला आणि पुढे चालू लागलो.

    तेथून मग रूळलेल्या वाटेने पारगाव तर्फ मढ या गावी आलो. तिथून आपल्या गाडीजवळ चालत गेलो आणि आपले साहित्य बांधून नगर कल्याण या महामार्गावर आलो. मढ या गावापासून अर्ध्या तासाच्या वाटचालीवर खिरेश्वर हे श्री हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे गाव होते. पण रात्र खूप होणार हे जाणून आणि पुन्हा सर्व मित्रांना घेऊन येऊ असे ठरवून मग परतीचा रस्ता धरला. गणेश खिंड मार्गे वाटेतील लेण्याद्रीला नमस्कार करून जुन्नरला आलो आणि मग थेट आपले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गाठले. सायंकाळी ठीक साडेसातला पोहोचलो आणि माझी दोन दिवसांची, अठ्ठेचाळीस तासांची, आठ किल्यांची, नाणेघाटाची एकट्याने भेट घेणारी वाटचाल संपली.

(टीप - माझी ही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील वाटचाल दिनांक ७ डिसेंबर २०१९ ते ९ डिसेंबर २०१९ या काळामध्ये संपन्न झाली ,माझ्या इतर व्यस्ततेमुळे लिखाणास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व...उत्सुक मित्रांना हे सर्व भाग आता एकत्र वाचता येतील.)
धन्यवाद

समाप्त...!


























No comments:

Post a Comment

नक्की महत्त्वाचे काय ?

  28 मे 2023 रोजी महिला कुस्तीगीर विनेश फोगट आणि साक्षी मलिक या  लैंगिक अत्याचाराचे आरोप करीत निदर्शन करीत होत्या त्यांना दिल्ली पोलीस रस्त्...