सह्याद्रीचे वारे भाग-दोन
शिवजन्मभूमीला मनोभावे वंदन करून आपल्या एकटा जीव सदाशिव या उक्तीला अनुसरून पुढील वाटचालीकडे कूच केले. जाताना जुन्नरकडे न वळता कुसूर फाट्यावरून उजवीकडे वळून किल्ले श्री शिवनेरी च्या प्रदक्षिणा मार्गाने किल्ले चावंडकडे निघालो. शिवनेरीच्या दक्षिणेकडून पश्चिमेकडे जाताना क्रमाक्रमाने शिवनेरीच भेदक रूप अभिमानाने आपला ऊर भरून आणते.सकाळी 10-20 वाजताच जबरदस्त अशा कातळ कड्यांनी वेढलेल्या किल्ले श्री चावंड चे दूरदर्शन होऊ लागले. जसजसा चावंड जवळ येऊ लागला तसतसे त्याचे उरात धडकी भरवणारे रूप माझ्या मनात उत्साहाची कारंजी उडवू लागले. कधी एकदा त्या कातळ कड्याला भिडतोय असे झाले. चावंड च्या पायथ्याशी वनविभागाची चौकी आहे तिथे दहा रूपयांची पावती केली. सकाळपासून नारायणगड व शिवनेरी किल्ल्यावर पाठीवरील संसार घेऊनच चढाई केली होती. यावेळी मात्र सर्व साहित्य कर घेणाऱ्या चौकी जवळील काकांजवळ ठेवून काठी आणि पाण्याची बाटली तेवढी घेतली. काहीच खाल्ले पिले नसल्यामुळे दहा मिनिटे तिथेच आपला चिरमुरा-फरसाण अल्पोपाहार घेतला, पण खरं सांगायचं तर एक एक घास बळेच घेत होतो. कारण चावंडचे ते रूप शत्रूच्या उरात भलेही धडकी भरवत असले तरी मला मात्र दोन्ही हातांनी अलिंगनासाठी साद घालत होते, मग काय ठेवली बाजूला शिदोरी आणि निघालो एका कातळरूपात उभ्या असलेल्या दुर्गाला भेटायला. श्री चावंडची चढाई खडी असली तरी बांधीव आधुनिक पायऱ्यांमुळे आपणाला सोपीच वाटते.हा पायऱ्यांचा मार्ग झाल्यावर कातळात खोदलेल्या आणि अतिशय अरूंद आणि हमखास घाम फोडणाऱ्या कोरीव पायऱ्या लागतात. या पायऱ्यांच्या शेवटी एका पायरीच्या बरोबर मधोमध एक छोटी तोफ रोवलेली आढळते. आज या अवघड दरीलगतच्या मार्गावरून आपण आधुनिक रेलींगच्या साहाय्याने ये जा करीत असलो तरी इतिहास काळात या तोफेलाच मजबूत दोर बांधून त्या दोराच्या साहाय्यानेच चढाई करत असावेत. कारण या मार्गाच्या तळाच्या पायरीवर एक खोबणी आढळते ज्यामध्ये कदाचित लाकडी काठी रोवून ती काठी व तोफ यांना दोर बांधला जात असावा. अर्थात हे माझे अनुमान आहे त्याचा उपयोग इतरही असू शकतो.या पायऱ्या संपताच आपण येऊन पोहोचतो प्राचीन कालखंडातील भल्या मोठ्या घडीव दगडांनी सजलेल्या आणि खड्या चढाईने आपल्या छातीचा भाता फुलवणाऱ्या अक्षरशः गुडघ्याएवढ्या उंचीच्या पायरी मार्गावर. प्राचीन काळातील भारदस्त भारतीय वीरांच्या शक्तीशाली उर्मीची अनुभुती त्या पायऱ्या चढताना झाल्याशिवाय राहत नाही. ही वाट आपल्याला थेट इतिहासात घेऊन जाते. सुमारे पन्नास साठ पायऱ्या चढून जाताच काही खडकात कोरलेला आणि काही घडीव दगडांनी बनलेला महादरवाजा लागतो. दीपावलीत दुर्गप्रेमींनी साजरा केलेल्या दीपोत्सवाच्या खुणा फुलांच्या माळांच्या रूपाने शिल्लक होत्या. निर्माल्य बनलेल्या त्या फुलांच्या ताज्या सुगंधाने कधी काळी गडकोटांसाठी स्वतःच्या जीवाला अशा फुलांप्रमाणे उधळून टाकणाऱ्या मावळ्यांच्या आठवणीने जीव कासावीस झाला. आपसूक त्या दरवाजासमोर नतमस्तक झालो आणि गडावर प्रवेश करता झालो आणि जे पाहिले ते अगदीच अनपेक्षित होते. संपूर्ण गड कंबरे इतक्या उंच गवत आणि झुडूपांनी व्यापला होता . आजवर पाहिलेल्या गडावर इतके वाढलेले गचपण कधीच नजरेस आले नव्हते . सुदैवाने छोटी मोठी दगडे टाकून गडावर असणाऱ्या प्रत्येक अवशेषांकडे जाणारी वाट दुर्गसंवर्धन करणाऱ्या शिवभक्तांनी बनवली होती.मग सुरू झाला त्या वाटेवरून इतिहासांच्या साक्षीदारांना डोळ्यात साठवणारा प्रवास.दोन्ही बाजूला अतिशय तण माजलेले आणी मी बापडा एकटाच शोधक दुर्गयात्री , सुरक्षितता म्हणून हातातील काठीचा आवाज करत, जोराने जमिनीवर तिला आपटत चालत होतो.सुरूवातीलाच ज्या इमारतीने कधी काळी न्याय निवाडे ऐकले, राजांनी धाडलेले खलिते वाचताना ऐकले असतील, गावागावातून आलेल्या गोरगरीब रयतेची गाऱ्हाणी ऐकली असतील त्या सदरेचे उध्वस्त अवशेष स्वतःच्या गाऱ्हाण्याला कोण ऐकून घेईल या अपेक्षेने पाहताना दिसावी इतक्या मलूल अवस्थेत पहूडली होती. तिच्या अवस्थेची मनातील कालवाकालव तशीच घेऊन जड अंतःकरणाने पुढे चालू लागलो. वाटेत प्राचीन काळातही साधनशूचितेला किती महत्त्वाचे स्थान होते हे दाखविणारे सुस्थितीतील शौचकूप होते. थोड्याच अंतरावर त्या गचपणातूनही दुरूनही दिसणारी चौकट खुणावू लागते. काय असावे बरे? म्हणत उत्साहाने पावले वेगाने टाकून पुढे जाताच आपल्या समोर येते एक अनोखे दुर्गशिल्प; गडाच्या प्राचीनतेची साक्ष देणारी पाण्याने आणि कोरीव कलाकारी ने काठोकाठ भरलेली पुष्करणी आणि जीर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत असणारे महादेव मंदिर. किल्ले हरिश्चंद्राची आठवण येईल अशी सुंदर पुष्करणी आणि इतिहासामध्ये वैभवसंपन्न शिल्पकलेने नटलेल्या मंदिराची साक्ष देणारे अवशेष पाहिले. तिथेच एक भग्न वराहमूर्ती आहे. तोंड नसूनही त्याची ओळख पटण्याचे कारण म्हणजे नंदीला जसा वशिंड असतो तो त्या मूर्तीला नाही. तिथून मग दक्षिणेस त्या रचलेल्या दगडी पायवाटेने चालू लागलो. वाटेत सप्तमातृका स्थानाकडे अशी पाटी दिसताच डावीकडे वळलो आणि थोड्याच क्षणात कुणीही पाहिले तरी भान हरपून जावे, मनात तिथल्या शांततेची धडकी भरावी, त्या प्रचंड मोठ्या जलाशयात एखादे भयानक जलचर तरी वास्तव्य करीत नसेल ना अशी भीती उत्पन्न व्हावी असे सप्तमातृका स्थान आपल्या नजरेस पडते. एका मोठ्या विस्तीर्ण कोरीव टाक्यामध्ये दगडी भिंतींनी अलग केलेले ते जलाशय पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो. या जलाशयात उतरण्यासाठी कोरीव मार्ग असून दरवाजावर गणेशाची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. (सप्तमातृका म्हणजे सात माता, वैदिक संस्कृती जिथे उदयाला आली तो सप्तसिंधूंचा प्रदेश, तिथल्या सात नद्या सात माता मानून त्यांचे स्तवन आणि पूजन वैदिक संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला. इतिहासाच्या पुढील वाटचालीत काळ आणि प्रदेश बदलत जाईल तसा त्याचे स्वरूप बदलत गेलेले आपणास दिसून येते. याच सप्तमातृका पुढे सातीआसरा बनल्या). त्या टाक्यांच्या मधल्या भिंतीवर चालण्याचा थरार अनुभवला. चुकून अडखळून आपण या टाक्यात पडलो तर असा विचार माझ्या मनात एखादी वीज चमकावी तसा चमकून गेला. मी थोडा भाग्यवानच आहे म्हणून तसं काही झाले नाही. नाहीतर पोहून बाहेर आलो असतो नक्कीच पण तुम्हा दुर्गमित्रांना हे इतिहास धन दाखविणारी छायाचित्रे मात्र मी दाखवू शकलो नसतो. असे काहीही विचार त्या क्षणी मनात येत होते आणि मी मात्र खुदूखुदू गालात हसत होतो.त्याला लागूनच घडीव दगडांचे खूप सारे अवशेष "इथे इतिहास काळात मोठी इमारत होती बरं का ?" असे खुणावून सांगतात. त्यांचे ते बोल कानात साठवून घेतले आणि गडाच्या अगदी दक्षिण कड्यालगत असणाऱ्या गुहांकडे गेलो.तिथे जाताच पाहिले की त्या गुहा आणि गुहामंदिरे जंगलातील माकडांनी व्यापून टाकला आहे आणि मी तर एकटाच.... मग काठी जमिनीवर टेकवून चालण्याऐवजी तिला फक्त खांद्यावर घेतली मग काय अवघ्या सेनेने माझी वाट मोकळी केली. त्यांना कसलाही उपद्रव न देता इतिहासाची दौलत असणाऱ्या यादव काळातील गुहा पाहिल्या. गुहांसमोरच कुकडी नदीवरील माणिकडोह जलाशय अतिशय सुंदर दिसत होता. आता गडाच्या सर्वोच्च टोकावरील चावंडा देवीच्या मंदिराचे दर्शन घेणे अगत्याचे होते. मग काय पुन्हा गवत, झुडपे, दगडीवाट आणि आपले पाय दुसरा विचार आणायचाच नाही लक्ष्य प्राप्त होई पर्यंत. अगदी थोड्या वेळात मी देवीसमोर नतमस्तक झालो. मंदिर प्राचीन असून दारात काही मूर्ती आणि एकमेकांवर रचून ठेवलेल्या दगडांनी बनलेली दीपमाळ पाहिली. मंदिर प्रदक्षिणा घातली आणि इतिहासाचा अमूल्य ठेवा आपल्या शिरावर धारण करणाऱ्या किल्ले श्री चावंड ला वंदन केले आणि गडउतार होण्यास सुरूवात केली. गडाच्या सभोवती नैसर्गिक कातळकडा असल्याने तटबंदी आवश्यक अशा थोड्या ठिकाणी आढळते. उतरताना महादरवाजात एक समाधानकारक दृश्य दिसले लहान बालगोपाळांची सहल कठीण चढाईचा (त्यांच्या वयाच्या विचाराने) हा किल्ला चढून आले होते आणि छान शिदोरी सोडून त्यांचा गोपाळकाला चालू होता. त्यांनाही रामराम करून मी गड उतार झालो. अगदी दहा मिनिटांत गडउतार झालो. मला गड पाहायला दीड दोन तास पुरले. त्या काकांजवळील आपले साहित्य घेतले. आपली ठरलेली बांधणी करून किल्ले श्री चावंड चा निरोप घेतला आणि निघालो. निघत असतानाही श्री चावंडचा अजस्त्र कडा आणि त्याचे रूप मला पुन्हा पुन्हा मागे वळून पाहायला भाग पाडत होते. त्याचे पुन्हा एकदा दर्शन घेऊन निघालो सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर विराजमान असलेल्या आणि प्राचीन नाणेघाटाचा संरक्षक दूर्ग असणाऱ्या रांगड्या किल्ले श्री जीवधनच्या भेटीला...
(क्रमशः)


















No comments:
Post a Comment