सर्वांग सुंदर चावंडचा निरोप घेऊन नाणेघाट रोडने घाटगर या किल्ले श्री जीवधनकडे कूच केले. वाटेत विशाल माणिकडोह जलाशय आपल्या लोभस रूपाने डोळ्यांना शितल अनुभव देत होता. सह्याद्रीच्या गिरीशिखरांनी वेढलेल्या त्या वाटेवरून जाताना प्रत्येक पर्वत आपल्या वैशिष्ट्य पूर्ण आकारांनी माझ्या वाटचालीला उत्साह पुरवत होता. हळूहळू रांगड्या जीवधनचे दूरदर्शन होऊ लागले तशी माझी सोबतीन आणखी वेगाने धावू लागली. तसेही ती अडीच तीन हजार वर्षापूर्वीपासून राबता असणाऱ्या नाणेघाटाच्या मार्गाकडे पहिल्यांदाच जात होती. जसजसा जीवधन जवळ येऊ लागला तसतसे त्याच्या अजस्त्र, प्रचंड आणि रांगड्या रूपाचे दर्शन होऊ लागले. सह्याद्री सह्याद्री म्हणजे काय ते या परिसरात आल्यावर उमजल्याशिवाय राहत नाही. घाटगर या पायाथ्याच्या गावी येताच तिथे पानसरे मावशींच्या घरी आपले साहित्य ठेवले समोरच हातपंप होता पाणी भरून घेतले आणि मावशींना विचारले कसे जायचे आणि त्यांच्या सांगण्यानुसार सुरू केली आपली वाटचाल. महादेव मंदिरापासून वर जायचे असे त्यांनी सांगितले होते. त्या मंदिराच्या परिसरातील देवतांचे दर्शन करून गडाकडे चढाई सुरू केली.
साधारणपणे दुपार होत आली होती आणि मी डोक्यावर आपले शिरस्त्राण घालून गडाला सर करण्यासाठी भिडणार होतो. सकाळी सहा वाजल्यापासून अखंड पायपीट नारायणगड, शिवनेरी, चावंड सारखे एकाहून एक बेलाग किल्ल्याची चढाई करून पुन्हा जीवधन सर करणे म्हणजे शरीर नावाच्या गोष्टीची अखंड होळी करून पुन्हा धुलीवंदन खेळण्याचा प्रकार होता. त्यातही तहान भूक विसरून सह्याद्रीला आपलेसे करताना काल रात्रीपासून अन्न नावाचा पदार्थ पाहिलाही नव्हता. तरीही... हो... तरीही मनातील उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती.
माझेच पाय मला विनवणी करत होते "अरे बाबा आमच्यावर तरी दया कर आणि थांब थोडे " मी मनोमन त्यांना सांगत होतो "तुमचा जन्म इथल्या तिथल्या मातीत नाही झाला, बारा तास अखंड धावून नऊ तास लढाई करणाऱ्या बाजीप्रभूंचे रक्त ज्या मातीत मिसळलेय त्या पावनखिंडीच्या मातीत झाला आहे. तेवीस दिवस अखंड रक्ताचा अभिषेक सोसून शेवटी याच स्वराज्यासाठी बलिदान पत्करणाऱ्या माझ्या धाकल्या छत्रपतींच्या मातीत पहिला श्वास घेतला आहे मी... एक दिवसाच्या पायपीटीचं कौतुक कुणाला सांगताय ?" असे सांगताच माझ्या थंड पडू पाहणाऱ्या रक्ताला पुन्हा एकदा उकळी फुटली आणि तसेच सळसळत त्या जंगल वाटेत शिरलो. मधल्या या टप्प्यात जंगलात अगदी निर्जन दूर दूर कोणी नाही आणि मी आपल्या जीवधनच्या ओढीने ती पायवाट चालत जात होतो.क्षणाक्षणाला त्या जीवधनचे कातळरूप डोळ्यात साठवत वर चढत राहिलो .दोन्ही बाजूने घनदाट जंगल झुडपे होती. वाट झुडूपातून शोधावी लागत होती. थोड्याच वेळात जीवधनचा कातळकोरीव टप्पा लागतो.मी आपले तोल सांभाळून एक एक पायरी पार करत शिडीजवळ जाऊन पोहोचलो कधीकाळी अतिशय अवघड असणाऱ्या या दोन टप्प्यावर वाटेवर वीस फूट लांबीच्या दोन शिड्या लावल्या आहेत. अतिशय अजिंक्य अशी रणमंडळ रचना इथे आपल्याला आढळून येते. हा टप्पा पार करून वर आल्यावर आपणास जुन्नर दरवाजाचे भग्न अवशेष नजरेस येतात आणि जवळच एक पाण्याचे टाके दिसते. सुरूवातीला काही वाड्यांचे अवशेष दिसतात.तिथून वर येताच लागते प्राचीन कालखंडात बांधलेले आणि कोरीव असा संगम असलेले धान्य कोठार. ही सुंदर वास्तू कोरीव नक्षीदार खांबांनी सजलेली असून अगदी आत गेल्यावर देखणी छोटी चौकट आपल्याला पाहता येते. ते पाहून मग गडाच्या सर्वोच्च शिखरावर असणाऱ्या जीवाई देवीच्या मंदिराकडे गेलो. ऊन, वारा, पाऊस यांचा अखंड मारा सहन करत ती माऊलीची मूर्ती उघड्या आभाळाखाली राहून आम्हा दुर्गभक्तांना मायेची सावली देत आहे. देवीला वंदन करून आणखी पुढे गेल्यावर दोन अपरिचित आणि पडझड झालेल्या समाधी दिसल्या. जिवंतपणी अंगावर शत्रूचे घाव हसत हसत झेलणाऱ्या अनामिक वीरांच्या समाध्यांनाही हे निसर्गाचे घाव सोसण्याचे सतीचे वाण चुकलेले नाही, असे काहीसे वाटून गेले. तिथून आणखी पुढे जाताच आपल्या डोळ्यांना सह्याद्रीच्या रौद्र रूपाचे दर्शन होऊ लागते. तिथे एक असा दगड आहे ज्यावर जायचा विचार जरी आला तरी छाती दडपून जावी, मणा-मणाच्या बेड्या पायी पडल्यासारखे आपले पाय जागच्या जागी थांबावेत अशी जबरदस्त खोल दरीचे दर्शन घडवणारी ती जागा कोणीही एकदा तरी नक्की अनुभवावी. तो थरार अनुभवतोय तोवर उजवीकडे वानरलिंगी सुळका दिसला मग काय? कधी एकदा तिथे जाऊन त्याला पाहीन असे झाले. मग टाकोटाक त्या कड्याच्या जवळ जाऊ लागलो. जसजसा मी जवळ जाऊ लागलो तसतसा तो सुळका इतका भयानक दिसू लागला ना की काही बोलूच नका, तिथे पोहोचताच मी सपशेल पोटावर झोपूनच तो अजस्त्र सुळका, दोन्ही मध्ये असलेली महाकाय दरी पाहू लागलो. माझ्या नशिबाने रॉकक्लाईंबिंग करणारा एक अखेरचा शिलेदार दोराच्या साहाय्याने तो सुळका उतरत होता आणि मी ते अगदी अपूर्वाईने माझ्या डोळ्यांत साठवून घेत होतो.खालील त्याचे सहकारी त्याला साथ देत होते. तो वीर आणि त्याचे सहकारी मला मुंगीइतके दिसत होते.आणि मी ते पाहताना एक पाखरू राहून राहून माझ्या समोरून भिरभिरत होते. त्याला पाहून मला त्याच्या पंखांचा हेवा वाटला.
असे पंख असते तर मीही भिरभिरत सह्याद्रीच्या या कड्याला आपलेसे करत अवघा सह्याद्री पालथा घातला असता. या धडकी भरवणाऱ्या कड्यावरून झेप घेऊन या गडकोटांभोवती पिंगा घातला असता. ज्या कड्यावर चढायची हिंमत फक्त वाऱ्याला आणि उतरायची छाती केवळ पाण्याच्या धारेला होते तो प्रत्येक कडा न् कडा पाहिला असता.पण शेवटी कल्पना आवरून तो शिलेदार खाली पोहोचताच उठून पश्चिमेकडील दरवाजाकडे गेलो.
- जीवधनवर आपल्याला पावलोपावली प्राचीनत्वाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू आढळतात. त्यातील सर्वात सुंदर वास्तू म्हणजे पश्चिम दरवाजा. अखंड दगडात कोरलेला आणि माथ्यावर सूर्य चंद्राची प्रतिमा मिरवणारा हा दरवाजा आवर्जून पहावा असाच आहे. पावसाने वाहून आलेल्या दगड धोड्यांनी बुजण्याच्या स्थितीत आहे. इथून येणारी वाट अत्यंत थरारक असून दरीच्या काठावरून दोराच्या साहाय्याने चढाई करावी लागते. या दरवाज्याच्या माथ्यावर येताच दिसला तो अडीच हजार वर्षापूर्वीपासूनच्या खाणाखुणा अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या नाणेघाटालगतचा नानाचा अंगठा नावाचा कातळकडा. दुरूनही त्याची भेदकता जाणवत होती. हा पश्चिमेकडील प्रदेश डोळ्यात साठवून परतीच्या प्रवासाला लागलो. जीवधन चढताना जसे जपून रहावे लागते तसेच उतरतानाही जपूनच रहावे लागते. एक वाजता गडचढाई करून मी बरोबर 3-45 ला गड पायथ्याशी आलो.तिथे बसलेल्या आजीबाईंना मी एकटे येण्याची काय अपूर्वाई वाटली . म्हणाल्या "असं एकटे येण्यापेक्षा जोडीनं ये बाबा...!" त्यांच्या विनोदी बोलण्याला मीही खळाळून हसत हसत दाद दिली.
मग आपले साहित्य बांधून नाणेघाट पहायला गेलो. जाताना पायथ्यापासून दिसणारा जीवधन आणि वानरलिंगी सुळका मी तिथे उभा होतो याची आठवण करून देत होता. नाणेघाटाचा दगडी रांजण फरसबंदी मार्ग पाहताना मला माझ्या पूर्वजांचा अभिमान वाटू लागला, इतके भव्य काम होते ते. एका पावसाळ्यात हा नाणेघाट पायी चढायचा असे मनाशी नक्की केले. शेजारच्या गुहेतील गौतमीपुत्र सातकर्णी याच्या काळातील पाली भाषेतील आणि ब्राम्ही लिपीतील शिलालेख पाहिला अशाप्रकारे एका दिवसात एकूण चार गड आणि हा नाणेघाट पाहून पुढील प्रवासासाठी निघालो.
जाताना माणिकडोहाच्या उत्तरबाजूचा मार्ग धरला आणि हडसर पायथ्याचे पेठेची वाडी हे ठिकाण गाठले. अंधुक प्रकाशात न्हाऊन निघणारा बेलाग हडसर किल्ला पाहून मन तृप्त होत होते आणि ओढ लागली उद्या च्या चढाईची. या ठिकाणी मुक्काम कसा झाला सांगेन लवकरच .....
(क्रमशः)

















No comments:
Post a Comment