नुकतेच पावसाळी अधिवेशन संपन्न झाले. यामध्ये एका हरहुन्नरी राजकीय व्यक्तीमत्वाची ओळख महाराष्ट्राला नव्याने झाली. केवळ मित्र पक्षच नव्हे तर अगदी राजकीय कारकीर्दीच्या जन्मापासून ज्यांनी वैचारिक विरोधातच भूमिका मांडली, कट्टरपेक्षाही कट्टर वैरत्व पत्करले अशा दिग्गज राजकीय विभूती मंडळींनाही हसत-हसत दाद देऊन हात जोडायला लावणारा मुख्यमंत्री नेता महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीजावर उगवला आहे. एखाद्याचा राग येणं, चीड येणं, द्वेष असणं ही स्वाभाविक मनोवृत्ती आहे. पण अशा द्वेषमूलक राजकीय मुद्द्यांना 'विनोदी' अस्त्राने नामोहरम करणारा राजकारणी तुम्हाला पराभूत करायचा असेल तर त्याच्या इतकेच व्यवहारी, हुशार, हजरजबाबी आणि द्वेषविरहीत असावे लागेल. केवळ टीका आणि टोमण्यांनी तो पराभूत तर होणारच नाही, उलट आणखी बलशाली होऊन तुमच्या समोरचे सर्वात मोठे आव्हान बनून राहील. कारण सन 2002 पासून केवळ बदनामी करून नरेंद्र मोदी नावाच्या माणसाला पराभूत करता येईल अशा भ्रमात राहिलेल्या प्रत्येक पुरोगाम्यांना, राजकारण्यांना, पत्रकारांना आणि विचारवंतांना मोदी नावाचे राजकीय आव्हान पेलवता पेलवत नाहीये.
जर एकनाथ शिंदे अडीच वर्षापूर्वीच मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभले असते तर कदाचित पक्ष संघटना बळकट करून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वगुणांनाही झाकोळून टाकले असते. पण असे होणे नव्हते हिऱ्यासारखा असा मौल्यवान माणूस देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या पारड्यात स्वतःहून टाकणाऱ्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री माननीय विधानपरिषद आमदार उद्धव ठाकरे तसेच विधानसभा आमदार आदित्य ठाकरे यांना भाजपचे चाहते आणि हितचिंतक मनोमन धन्यवाद देत असतील. पाहू अजूनही निवडणूक आयोगाचा आणि मुंबई महानगरपालिकेचा निकाल यायचा आहे. तो येईल तेव्हा राब-राब राबणाऱ्या कार्यकर्त्यांचे मूल्य काय असतं हे कळून येईल कदाचित, तेही कळून घ्यायचं असेल तर,नाहीतर आहेच संभाजी ब्रिगेड मदतीला..
सुहास पाटील.
२८/०८/२०२२

No comments:
Post a Comment