पूर्वाश्रमी शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभा गाजवून सोडणारे सध्याचे राष्ट्रवादीचे आमदार यांनी नुकतेच एक क्रांतिकारक विधान केले "आमच्या भगिनींच्या अंधश्रद्धेबद्दल काय बोलावे? आजकाल शाळेत सरस्वती शारदामातेचे फोटो लावले जातात, सावित्री मायचा लावा, ज्योतिबा फुलेंचा लावा, शाहू महाराजांचा लावा.....ज्या सरस्वतीला आम्ही पाहिलं नाही ,जिने आम्हाला कधी शिकवलं नाही ,शिकवलं असेलच तर तीन टक्क्यांना तिचा फोटो आम्ही का लावावा ? वगैरे वगैरे ..."
सदर विधानामध्ये वर वर पाहता थोर समाजसुधारकांचा आदर दिसून आल्याने सरळमार्गी व्यक्तीला या विधानाचा पुरस्कार करावा की तिरस्कार करावा? याबद्दल बुचकळ्यात पडतो आणि गोंधळून जातो. मुद्दा समाजसेवकांचा फोटोसाठी आग्रहाचा नसून सरस्वती पूजनाबद्दलच्या पोटदुखीचा आहे. कोणाच्याही फोटोपूजनाचा आग्रह जरूर असावा पण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरस्वती शारदामाता या हिंदू दैवी प्रतिकांवर आघात केला जातोय हे काहींना लक्षातच आलेले नाही. सरस्वती मातेचा मोठा भक्त वर्ग किंवा देवस्थान नसल्यामुळेच छगनराव हे विधान करू धजले. एखाद्या वादाचा किंवा विषयाचा आरंभ होतो त्याचा प्रवास कुठे पर्यंत जाऊन थांबू शकतो याची कल्पना सदर विधानाचा पुरस्कार करणाऱ्यांना नसावी. उदाहरणार्थ विद्येची देवता जशी सरस्वती माता आहे तशी कलेची देवता श्री गणराय आहेत, समृद्धीची देवता श्री लक्ष्मी माता आहे, बलोपासनेची देवता श्री मारूतीराय आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आहे इत्यादी इत्यादी.
आता मला सांगा श्रीयुत छगनराव तुमच्या विचाराप्रमाणे यातील कोणतीच देवता कोणीही पाहिली नाही मग तुम्ही प्रत्येक कलेच्या सादरीकरणाआधी गणेशवंदना ऐवजी बच्चन वंदन घेणार आहात का ? दीपावलीमध्ये समृद्धीची देवता असणाऱ्या लक्ष्मीपूजनाऐवजी अंबानी-अदानी पूजनाचे कार्यक्रम घेणार आहात का? गावोगावचे मल्ल आखाड्यात मारूतीरायाचे स्मरण करून शड्डू ठोकतात त्यांना दरवर्षीच्या हिंदकेसरींचे वंदन घ्यायला लावणार आहात काय ? ज्या शाहूमहाराजांच्या नावाने तुम्ही पुरोगामीत्वाचे ढोंगी राजकारण करता त्या शाहूराजांच्या दहा मुद्रांपैकी नऊ मुद्रांवर जय भवानी लिहिले आहे हे तरी तुम्हाला माहिती आहे का ? तुमच्याच वळचणीला जन्मलेल्या ब्रिगेड नावाच्या जमातीने त्याच भवानी मातेच्या जयजयकाराऐवजी जिजाऊंच्या जयजयकाराचा आग्रह सुरू केला होता महाराष्ट्रात. हिंदू दैवतावर आघात करण्यासाठी त्या देवतेची मातब्बर भक्ती करणाऱ्या जिजाऊ माँसाहेबांचा वापर केला तुमच्या चेल्या-चपाट्यांनी हे काय आम्ही विसरलेलो नाही अजून. तुमच्या समाज सुधारकांच्या पूजनाचा मार्ग निदान सर्व सामान्यांच्या श्रद्धा स्थानांच्या हेटाळणीपासून सुरू होऊ नये हीच आग्रही मागणी.
मित्रहो सांगायचा उद्देश एकच आहे. हिंदू धर्मात असणारी ही सर्व दैवते विविध मानवी सद्गुणांची निर्गुण निराकार नव्हे तर सगुण साकार रूपी प्रतीके आहेत. एकाच ध्येयाने वाटचाल करणाऱ्या विविध मानवी समूहाला नेतृत्व, आधार, शक्ती, प्रेरणा देणाऱ्या प्रतीकरूपी देवता आहेत. महाराष्ट्राच्या भक्तीरूपी विठ्ठलाला भेटायला जाणाऱ्या प्रत्येक वारकरी बांधव-भगिनी ज्या भावनेने पांडुरंगाला पाहतात, पूजा करतात त्याच पवित्र भावनेने प्रत्येक विद्याभ्यासक सरस्वती शारदामातेचे स्तवन तक्षशिला नालंदा इथल्या विद्याकेंद्रांपासून करत आलाय.
एवढी सगळी प्रतिके पाहून गडबून जाऊ नका तुमचे आराध्य दैवत श्रीयुत शरदचंद्रजी पवारसाहेब हेही महाराष्ट्रातील एका विशिष्ट गोष्टीचे प्रतिक आहेत. ते एकदा शोधा म्हणजे आपण बाळासाहेब ठाकरे नावाचे दैवत सोडून यांच्या सोबत का आहोत हेही कळून येईल...
सुहास पाटील.
०२/१०/२०२२

No comments:
Post a Comment